भूकंपग्रस्तांच्या उमेदीवर फेरले जातेय पाणी

सोमनाथ स्वामी
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

किल्लारीतील निसर्ग प्रकोपाच्या 24 वर्षांनंतरही घडी विस्कटलेलीच

किल्लारीतील निसर्ग प्रकोपाच्या 24 वर्षांनंतरही घडी विस्कटलेलीच
किल्लारी - येथे 1993 ला झालेल्या भूकंपाला 24 वर्षे उलटली. तेव्हापासून येथील लोकांची विस्कटलेली जीवनाची घडी आजही बसलेली नाही. भूकंपग्रस्त आरक्षणामुळे शेकडो तरुणांना शासकीय नोकरी मिळाली. मात्र, अद्यापही अनेक तरुण बेरोजगार आहेत. दैनंदिन अडचणींवर मात करून लोक नव्या उमेदीने जगू पाहत आहेत; परंतु वारंवार येणारा दुष्काळ आणि किल्लारी साखर कारखाना बंद पडल्याने स्थानिक नागरिक अडचणीत सापडले आहेत.

भूकंपाच्या घटनेपासून 30 सप्टेंबर हा दिवस किल्लारी आणि परिसरातील 52 खेड्यांमध्ये काळा दिवस पाळला जातो. त्यानिमित्ताने प्रशासकीय अधिकारी व नागरिकांच्या वतीने येथील स्मृतिस्तंभाला श्रद्धांजली वाहण्यात येते. बाजारपेठ बंद ठेवून दुखवटा पाळण्यात येतो.

शैक्षणिकदृष्ट्या किल्लारी येथे तीन माध्यमिक, दोन उच्च माध्यमिक, तर एक पदवी महाविद्यालय आहे. सेमी इंग्लिश, इंग्लिश, मराठी माध्यमाच्या शाळा, महाविद्यालये आहेत. स्पर्धेमुळे येथील शैक्षणिक आलेख वाढता आहे; परंतु शिक्षणानंतर बेरोजगार राहणाऱ्या तरुणांच्या हाताला काम देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

आज 2017 नंतरही येथील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास राज्य शासन कमी पडल्याचे चित्र आहे. अनेकांना अजूनही भूकंपग्रस्त प्रमाणपत्र मिळालेले नाही. पुनर्वसित घरेही मिळालेली नाहीत. किल्लारी तालुका कधी होणार? पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधा कधी मिळणार, हे प्रश्‍न अनुत्तरित आहेत.

'शासनाच्या वतीने भूकंपग्रस्त आरक्षण जाहीर करण्यात आले; परंतु याचा लाभ धनदांडग्यांनाच होत असल्याचे दिसत आहे. नोकरी भरतीदरम्यान दलाल, अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन रिक्त जागा भरली जात आहेत.''
- गोरखनाथ शेषेराव बिराजदार, स्थानिक नागरिक

Web Title: killari news earthquake affected issue