'हिंदू राष्ट्र जन्मले तर देशाच्या चिरफाळ्या उडतील'

Kumar Ketkar
Kumar Ketkar

लातूर : सेक्युलॅरिझम आणि लोकशाही हे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे मुख्य खांब आहेत. ते खांबच उखडून टाकण्याचा प्रयत्न सध्या देशात सुरू आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राची चर्चा जोरजोरात केली जात आहे. ज्या क्षणाला किंवा ज्या दिवशी हिंदू राष्ट्र जन्माला येईल त्या क्षणापासून वर्षभरातच आपल्या देशाच्या चिरफाळ्या उडलेल्या असतील. देश एकत्र राहणार नाही... अशा शब्दांत हिंदू राष्ट्र कल्पनेला ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर यांनी कडाडून विरोध दर्शवला. राज्यघटना न बदलाही ‘हे’ हिंदू राष्ट्र आणू शकतात. त्यामुळे सजग रहा, असेही त्यांनी सांगितले.

हैदराबाद मुक्तीदिनानिमित्ताने बाबासाहेब परांजपे फाउंडेशनच्या वतीने केतकर यांचे 'हैदराबाद मुक्तीसंग्राम' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी महापाैर सुरेश पवार, निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. देशमुख, माजी खासदार जनार्दन वाघमारे, संयोजन समितीचे अध्यक्ष मनोहर गोमारे उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर गुरूजी, मुर्ग्याप्पा खुमसे, हरिश्‍चंद्र बिरले या स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

केतकर म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळतेवेळी भारत अखंड राहावा, असे इंग्रजांना वाटत नव्हते. भारताचे तुकडे पाडण्याचा त्यांचा डाव होता. त्यांनी तो काही प्रमाणात साध्यही केला. पण त्यांचे अपूर्ण स्वप्न आत्ता आपलेच लोक पूर्ण करत आहेत, अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. कधी नव्हे इतक्या धर्मद्वेषाच्या वातावरणात आपण सध्या वावरत आहोत. याचे भीषण अाणि हिंस्त्र स्वरूप २०१९च्या आधी किंवा नंतर आपल्याला पहायला मिळणार आहे. राज्यघटनेला सुरूंग लावला जात अाहे. काश्‍मीरातील तरुणांना गोळ्या घालू म्हटले जात अाहे. जवाहरलाल नेहरूंच्या नावाने असलेल्या जेएनयूला उखडून काढू, अशी भाषा वापरली जात आहे. भारत सोडून जा,म्हटले जात आहे.  ही भाषा अशीच कायम राहणार असेल तर आपल्याला २०४७ मध्ये स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करता येणार नाही. देश एकत्र राहील, या भ्रमात राहू नका.

देशमुख म्हणाले, आपल्याला भौगोलिक स्वातंत्र्य मिळाले असले तरी आर्थिक अाणि सामाजिक स्वातंत्र्य अद्याप मिळाले नाही. शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. हे चित्र बदलण्याची अापल्याला पून्हा झटावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com