श्रमदान करून पोलिसांनी बुजवले खड्डे

श्रमदान करून पोलिसांनी बुजवले खड्डे

औरंगाबाद - जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून संरक्षण करणाऱ्या पोलिसांवर एकीकडे हल्ले होत आहेत. मात्र, दुसरीकडे सामाजिक भान जोपासत वाहतूक पोलिसांनी नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. संग्रामनगर उड्डाणपुलाच्या सुरवातीच्या रस्त्यावरील खड्डे रविवारी (ता. 18) दुपारी श्रमदानाने बुजवून आपले सामाजिक भानही दाखवून दिले आहे. 


शहरातील रस्ते, खड्डे हे समीकरण आता नागरिकांसाठी नवे नाही. दमदार पावसाने शहरातील रस्त्यांची लागलेली वाट दाखवून दिली. पण पॅचवर्क करून प्रशासनाने आपल्या कामांवर पांघरून घातले. यानंतरही पावसाने प्रशासनाची पाठ सोडली नाही अन्‌ रस्त्यांच्या कामाचा खेळखंडोबा झाला. यानंतर मोठी खडाजंगी झाली. खड्डेपुराण करून झाले. महापालिकेत गोंधळ घालून झाला. पण यातून खड्ड्यांची खोली वाढत गेली. ना वाहनधारकांचा त्रास कमी झाला, ना प्रशासनाचा ढिम्मपणा कमी झाला. खड्ड्यांवरून राजकारणही तापले. बोटचेपी भूमिका, गळचेपी अन्‌ चालढकल करून झाली. पण खड्डे बुजवायचे नाव मात्र कोणी घेईना. बुजवलेल्या जागीच पुन्हा खड्डा पडला तर बुजवणाऱ्यांचेही पितळ उघडे पडणार, म्हणून खड्डे बुजविण्याची तसदी कोण घेणार..? या खड्ड्यांची अन्‌ रस्त्यांची आता पोलिसांनाच कीव आली. वाहतूक नियमन करताना वाहनधारकांची खड्ड्यांमुळे होणारी तारेवरची कसरत आणि उडालेली तारांबळ पोलिसांनाच पाहवली नाही. संग्रामनगर उड्‌डाणपूल पूर्णपणे दुभाजकाने विभागलेला नाही. त्यातच या रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांनी वाहनधारकांनाच वेठीस धरले. संभाव्य अपघात किंवा मोठी दुर्घटना घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, लक्ष्मीकांत किसनराव बनसोड, जालिंदर रमेश जऱ्हाड या कर्मचाऱ्यांनी खडी आणून खड्डे बुजवत श्रमदान केले.

कर्तव्य निभावले...भानही जपले
खड्ड्यांमुळे आजवर काहींचा जीव गेला तर काही अपघातांत जखमी झाले आहेत. वाहनधारकांच्या जिवावर बेतणाऱ्या या बाबींचे सामाजिक भान राखून पोलिसांनी केलेले श्रमदान कौतुकाचा विषय ठरत असून, निदान आता तरी प्रशासनाने खड्ड्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा जनमाणसांतून व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी घ्यावी दखल
खड्ड्यांवरून शहराची रया जात असून, याचे सविस्तर विवेचन एका आमदारामार्फत मुख्यमंत्र्यांकडे शनिवारी (ता. 17) करण्यात आले. अर्थातच हे विवेचन डागडुजी व्हावी यासाठीच होते. आता यावर मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घ्यावा, अशी शहरवासीयांची भावना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com