लिंगबदलानंतर ललिता पुरुष म्हणून पोलिस दलात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

बीड - बीड जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस शिपाई ललिता साळवे यांच्यावर झालेल्या लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर आता त्यांना पोलिस दलात पुरुष प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी (ता. चार) पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना याबाबत महासंचालक कार्यालयातून पत्र मिळाले. या बहुचर्चित प्रकरणाचा आता नवा टप्पा सुरू झाला आहे. 

माजलगाव शहर ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत ललिता साळवे यांना सुरवातीला आपल्या शरीरात बदल होत असल्याचे जाणवू लागले. त्यानंतर त्यांनी लिंगबदल शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला व सप्टेंबर २०१७ मध्ये पोलिस अधीक्षकांकडे परवानगीसाठी अर्ज केला. अशाप्रकाराचा पोलिस दलातील हा पहिलाच प्रसंग असल्याने हे प्रकरण वरिष्ठांकडे वर्ग करण्यात आले. यावर बराच खल होऊन अखेर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून नऊ महिन्यांनंतर ललिता यांच्यावर गेल्या महिन्यात लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात शस्त्रक्रिया होऊन ललिता यांचा ललित झाला; मात्र पोलिस भरती अधिनियमाप्रमाणे शारीरिक पात्रतांमध्ये ललिता यांची उंची पुरुष प्रवर्गातील उमदेवारांसाठी असलेल्या निर्धारित उंचीपेक्षा कमी भरत असल्याने ललिता यांचा ललित होऊनही पुरुष प्रवर्गात समावेश होणार का? याकडे लक्ष लागले होते. अखेर महासंचालक सतीश माथूर यांनी विशेष बाब म्हणून ललिता यांना शस्त्रक्रियेनंतर पुरुष प्रवर्गात सामविष्ट करण्याचे निर्देश बीडचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना दिले आहेत. याबाबत सोमवारी पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे महिला संवर्गातून आणि त्या पात्रतेतून पोलिस दलात भरती झालेल्या ललिता साळवे आता याच पात्रतेतून पोलिस दलात पुरुष संवर्गात सामाविष्ट होतील.

Web Title: lalita salave Change the gender lalit salave police

टॅग्स