जिवंत शेतकऱ्याला मृत दाखवून दुसऱ्याच्या नावाने जमीन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

लातूर - "जे नाही ललाटी ते लिहील तलाठी‘ ही बिरुदावली ई-फेरफारच्या जमान्यात तरी मागे पडेल, असे वाटत होते. मात्र, ही बिरुदावली कायम ठेवत बिरवली (ता. औसा) येथील एन. आर. यादव या तलाठ्याने जिवंत शेतकऱ्याला मृत दाखवून त्याच्या नावाची जमीन परस्पर उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन व्यक्तींच्या नावावर केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

लातूर - "जे नाही ललाटी ते लिहील तलाठी‘ ही बिरुदावली ई-फेरफारच्या जमान्यात तरी मागे पडेल, असे वाटत होते. मात्र, ही बिरुदावली कायम ठेवत बिरवली (ता. औसा) येथील एन. आर. यादव या तलाठ्याने जिवंत शेतकऱ्याला मृत दाखवून त्याच्या नावाची जमीन परस्पर उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन व्यक्तींच्या नावावर केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

मूळचे बेलकुंड (ता. औसा) येथील रहिवासी असलेले अर्जुन मारुती सोलाणे (सोलनकर) यांची बिरवली (ता. औसा) शिवारात गट नंबर 182 मध्ये एक हेक्‍टर एक आर जमीन आहे. बाजूच्या उस्मानाबाद तालुक्‍यातील दाऊतपूर येथील सुधाकर दामोदर थोरात यांनी श्री. सोलाणे यांच्या या जमिनीचा फेरफार वारसा हक्काने त्यांच्या व त्यांच्या बहिणीच्या नावाने करण्याची मागणी बिरवलीचे तलाठी यादव यांच्याकडे 15 नोव्हेंबर 2015 रोजी केली. यात त्यांनी श्री. सोलाणे हे त्यांचे पणजोबा असून ते 17 सप्टेंबर 1991 रोजी मयत झाल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. फेरफारसाठीच्या अर्जासोबत त्यांनी त्यांचे वडील दामोदर थोरात व आई केराबाई थोरात यांच्या मृत्यूचा दाखला दिला व दाऊतपूर ग्रामपंचायतीचे 30 ऑक्‍टोबर 2015 रोजी दिलेले वारसा प्रमाणपत्र दिले. त्यात दामोदर थोरात यांचे सुधाकर थोरात, त्यांची बहीण सुरेखा वैभव कोकरे व मंगल अनिल मदने हे वारस असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात श्री. सोलाणे यांचे मृत्युपत्र दाखल करण्यात आले नाही; तरीही तलाठी यादव यांनी सुधाकर थोरात यांच्या अर्जावरून सात जानेवारी 2016 रोजी फेर क्रमांक 1344 घेतला. हा फेर बेलकुंडचे मंडळ अधिकारी एस. जी. सोनकांबळे यांनी डोळे झाकून दहा एप्रिल रोजी मंजूर केला. विशेष म्हणजे हा ई-फेरफार या ऑनलाइन प्रक्रियेतून झाला.

इकडे श्री. सोलाणे यांनी त्यांच्या जमिनीचा सातबारा काढला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. सातबारावरील त्यांचे नाव उडून दुसऱ्या कोणाची तरी नावे आल्याचे दिसून आले. चौकशी केल्यानंतर त्यांना मृत दाखवून तलाठ्याने दुसऱ्याच्या नावाने त्यांच्या जमिनीचा फेरफार केल्याचे पुढे आले. त्यांनी सहा जूनला उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज देऊन चुकीचा फेरफार रद्द करण्याची मागणी केली. अर्जासोबत त्यांनी हयातीचे प्रमाणपत्र तसेच निवडणूक ओळखपत्र आदी पुरावे दिले. या अर्जावरून केलेल्या चौकशीत तलाठ्याने सुधाकर थोरात यांच्याशी संगनमत करून हा प्रकार केल्याचे सिद्ध झाले. यामुळे उपविभागीय अधिकारी जाधव यांनी तलाठी यादव यांना तडकाफडकी निलंबित केले तर फेर मंजूर करणारे मंडळ अधिकारी सोनकांबळे यांच्याविरुद्ध कारवाईची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सगळा घोळात घोळ
सुधाकर थोरात यांनी काहीही नातेसंबंध नसताना अर्जुन सोलाणे हे त्यांचे पणजोबा असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. मात्र, तलाठी यादव यांनी थोरात हे नात्याने पणतू लागत असताना ते नातू असल्याचे व त्यांच्या दोन बहिणी नाती असल्याचे नमूद करून फेरफार केला. थोरात यांनी त्यांची आई केराबाई मरण पावल्याचे प्रमाणपत्र दिले; तर दाऊतपूर ग्रामपंचायतीने दिलेल्या वारसा प्रमाणपत्रात त्यांची आई म्हणून कौशल्याबाईचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे सोलाणे यांचे वय 35 तर सुधाकर थोरात यांचे वय 45 व त्यांच्या बहिणींचे वय अनुक्रमे 36 व 32 वर्षे आहे.

Web Title: Land of the living dead farmer showed the name of the second