क्षमता मोठ्या, संधी थोड्या

क्षमता मोठ्या, संधी थोड्या

ऑटोमोबाईल आणि मद्य उद्योगात औरंगाबाद हब समजले जाते. त्यापाठोपाठ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची क्षमता मोठी आहे. मात्र, सरकारच्या उदासीनतेमुळे येथे अद्याप एकही मोठा प्रकल्प नाही. माहिती तंत्रज्ञान उद्योग मेट्रो शहरात एकवटल्याने मराठवाड्यात तो अद्यापही बाल्यावस्थेतच आहे...

मराठवाड्यातील शैक्षणिक संस्थांमधून सुमारे वीस हजारांहून अधिक विद्यार्थी संगणकशास्त्रासंबंधी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. यामध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी, पॉलिटेक्‍निक, बी.एस्सी., बीसीएस, बीटेक, एमटेकचा समावेश आहे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्‍त त्यांच्यापर्यंत नवे तंत्रज्ञान पोचण्याची व्यवस्था नाही. यातील मोजके विद्यार्थी पदरचे पैसे खर्चून मेट्रो शहरात रोजगाराभिमुख शिक्षण घेऊन पुढे जातात. उर्वरित विद्यार्थ्यांना मिळेल ती, मिळेल तेथे नोकरी पत्करावी लागते. त्याव्यतिरिक्‍त माहिती तंत्रज्ञान उद्योगाला चालना मिळण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची (रस्ते, विमान, बस आणि रेल्वे आदी) वानवा आहे. हैदराबाद, पुणे, चेन्नई आणि बंगळुरू ही सर्व शहरे विमानांनी जोडलेली आहेत. त्याशिवाय माहिती तंत्रज्ञान उद्योगाला लागणाऱ्या पूरक सुविधा आणि प्रोत्साहन तेथील राज्य सरकारतर्फे दिले जाते. तुलनेत औरंगाबाद अथवा मराठवाड्यात नवा आयटी उद्योग येण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष प्रयत्न केले जात नाहीत. 

ग्लॅमर व चांगला पगार
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरवर्गाला चांगला पगार आणि ग्लॅमर निर्माण झाले आहे. या दोन्ही बाबींमुळे आयटी उद्योजक आणि नोकरवर्ग मेट्रो शहराला प्राधान्य देतात. त्या ठिकाणी मनोरंजन, पायाभूत सुविधा, मुलांसाठी दर्जेदार शैक्षणिक संस्था आदी उपलब्ध असतात. नाईट शिफ्टमध्ये काम करताना त्यांना ताणतणाव निवळण्यासाठी चोवीस तास हॉटेल्स, टॅक्‍सी आणि मनोरंजनासारख्या सुविधा हव्या असतात. त्यामुळे मराठवाड्यात शिकून विद्यार्थी नोकरीसाठी मेट्रो शहरातच जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात.

सॉफ्ट स्कील आवश्‍यक
मराठवाड्यातील तरुणांमध्ये आयटी उद्योगासाठी लागणाऱ्या क्षमता प्रचंड आहेत. मात्र, शैक्षणिक संस्थांमार्फत सॉफ्ट स्कील आणि कम्युनिकेशन हे विषय शिकविले जात नाहीत. त्यामुळे त्यांना स्वत:ला त्याच क्षमतेने व्यक्‍त करता येत नाही. त्यातून स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होतो. या न्यूनगंडामुळे मराठवाड्यातील तरुणाई रोजगाराभिमुख संधी मिळविण्यास सक्षम होत नाही.

उलाढाल केवळ ७० ते ८० कोटी
औरंगाबादमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पूर्णवेळ काम करणाऱ्या लहान-मोठ्या मिळून पन्नासच्या आसपास कंपन्या आहेत. हा उद्योग वाढीसाठी कुठल्याही प्रकारचा अँकर अथवा मोठा प्रकल्प नाही. या ठिकाणी विप्रो, इन्फोसिस आणि टीसीएससारख्या कंपन्या आल्यास रोजगार व उद्योगनिर्मिती होऊ शकते. सध्या अस्तित्वात असलेल्या कंपन्या स्थानिक पातळीवर मोबाईल ॲप्लिकेशन, वेबसाईट, वेब ॲप्लिकेशन, ईआरपी, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, युटिलिटी आणि लिव्हींग ॲप आणि आर्किटेक्‍चर डिझाईन तयार करून देण्याचे काम करतात. वर्षाकाठी या कंपन्यांत ७० ते ८० कोटी रुपयांची उलाढाल होते. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्कस्‌ ऑफ इंडियामध्ये केवळ १७ ते २० कंपन्या सुरू आहेत. राज्य सरकारने मराठवाड्यातील आयटी उद्योग बहरण्यासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध करून बंधनकारक केल्यास निश्‍चितच फायदा होऊ शकेल. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल.

तज्ज्ञ म्हणतात
औरंगाबादेत सध्या नावापुरता आयटी पार्क आहे. तो ‘आयटी पार्क’ म्हणूनच कार्यरत राहील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या पार्कमध्ये फक्त आयटी कंपन्याच कार्यरत राहतील, यादृष्टीने पावले उचलली जावीत. मराठवाड्यातील एकमेव आयटी पार्कमधील भूखंडांवर सध्या शाळा, मंगल कार्यालये, इतर उद्योग स्थापन झाले आहेत. मुळात या क्षेत्राचा वापर हा ‘नॉन आयटी पार्क’ म्हणूनच जास्त होत आहे. परिणामी मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. मोठ्या प्रमाणात गाळे तयार करून परवडणाऱ्या दरात नवीन आयटी उद्योगांना द्यावेत. सध्याच्या आयटी कंपन्यांना अवाच्या सव्वा भाडे आकारले जात आहे. ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांपासून उद्योगमंत्र्यांपर्यंत वारंवार पत्र पाठवून भाडेदर कमी करण्याची मागणी केली. सुमारे बारापट वाढविलेले भाडेदर देणे इथल्या आयटी उद्योगांना शक्‍य नाही; मात्र याबाबतीत सरकार निर्णय घेण्याचे टाळत आहे.
- संदीप पाठक, आयटी उद्योजक

माहिती तंत्रज्ञान उद्योगांबाबत बोलायचे झाल्यास आपली आधीच एक बस चुकली आहे. औरंगाबादला आयटी उद्योग बहरले पाहिजेत. आयटी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान उदयास येत असून त्यातही नवनवीन क्षेत्रांचा झपाट्याने विकास होत आहे. आता सध्या नवीन इंटरनेट ऑप्टिंग (आयओटी) हे भविष्यातील बाजारपेठ म्हणून बघितले जाते. औरंगाबादमध्ये तेवढी क्षमता आहे. आयटी उद्योगांसाठी आवश्‍यक असलेले मनुष्यबळ तयार करणे शक्‍य आहे; मात्र औरंगाबादेत आणि मराठवाड्यात आयटी उद्योग क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.  
- मुनीष शर्मा, माजी अध्यक्ष, सीएसआय

संपूर्ण जग आता डिजिटायझेशनकडे चालले आहे. पंतप्रधानही सध्या ज्या योजनांमध्ये पुढाकार घेतात, त्यात ऑनलाईनचा प्रामुख्याने समावेश असतो. थोडक्‍यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती आल्यासारखेच वातावरण तयार झाले आहे. अशा वेळी औरंगाबादेत फार मोठा वाव आहे. येथे डेटा सेंटर उभारले जाऊ शकतात. सरकारी योजनांसाठीचे आवश्‍यक तंत्रज्ञान विकसित केले जाऊ शकते. मोठ्या आयटी उद्योगांना येथे कमी खर्चात मनुष्यबळ मिळू शकते. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीअल कॉरिडॉरमध्येही आयटी उद्योगांसाठी क्षेत्र राखीव ठेवल्यास तेथे क्‍लस्टर उभे राहू शकते.
- नितीन नळगीरकर, अध्यक्ष, सीएसआय

औरंगाबादेत मोठा आयटी उद्योग आला पाहिजे. त्यातून छोटे उद्योग उभे राहतील. आपल्याकडील उद्योगांना प्रोत्साहन मिळते. माहिती-तंत्रज्ञानात संशोधनासाठी मोठा वाव आहे. संशोधनाचे नवीन क्षेत्र झपाट्याने समोर येत आहे. औरंगाबादेत आयटीमधील संशोधनासाठी काही प्रोत्साहनपर सुविधा उपलब्ध करून देता आल्या, तर हे क्षेत्र उभारी घेऊ शकेल. 
- केदार पानसे, आयटी उद्योजक, औरंगाबाद.

नवीन उद्योजकांसाठी चांगले इन्फास्ट्रक्‍चर हवे. नोंदणी आणि परवानगी एकाच वेळी मिळायला हवी. अभ्यासक्रम इंटरनॅशनल स्टॅंडर्डचा असल्यास इथली मुले, पुणे, मुंबई, परदेशी जाणार नाहीत. तसेच इन्क्‍युबेशन सेंटर उभारली पाहिजेत. त्यातून छोटे उद्योग वाढण्यासाठी मदत होईल. मोठी कंपनी आल्यास इथले टॅलेंट इथेच राहील. त्यामुळे इथले लोक इथेच थांबतील. आयटी उद्योजकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात. 
- सचिन काटे, इन्फोगर्ड इन्फॉर्मेटिक, औरंगाबाद.

देशभरात डिजिटलायझेशनचे वारे आहे. आयटी क्षेत्रात सुविधा भरपूर आहेत. त्यांची माहिती लोकांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. शिवाय त्याचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. स्मार्ट सिटीकडे आपण जात आहोत, त्यातून अपेक्षा आहेत. आयटीचा पुरेपूर वापर करून उद्दिष्टपूर्ती करू शकतो. बाजारात चांगले ॲप्स्‌ आहेत. त्यात वापरता येतील अशा चांगल्या गोष्टी आहेत.
- अंजना घुले-जाधव, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद.

इलेक्‍ट्रॉनिक कॉमर्स, ऑनलाईन बिझनेस, ॲन्ड्रॉईड ॲप्लिकेशन, इंटरनेट ऑफ थिंग्जची गरज आहे. मॅन्यूफॅक्‍चरिंग उद्योग असल्याने ऑटोमेशन टेक्‍नॉलॉजीची, रोबोटिक्‍सची गरज आहे. हेल्थकेअरमध्येही वाव असून घरबसल्या पेशंट मॉनिटरिंग होऊ शकते. स्मार्ट सिटीसाठी लागणारे तंत्रज्ञान त्याचे प्रशिक्षण, स्किल डेव्हलपमेंट आणि त्यानुसार अभ्यासक्रमात बदल करणे, स्थानिक कॉलेज ही आव्हाने आहेत.
- प्रा. एस. एन. जैस्वाल, आयटी विभागप्रमुख, जेएनईसी, औरंगाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com