लातुरात कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

रेल्वे विस्तारीकरणाला विरोध; आता ‘रेल्वे रोको’ची जय्यत तयारी

रेल्वे विस्तारीकरणाला विरोध; आता ‘रेल्वे रोको’ची जय्यत तयारी
लातूर - लातूर-मुंबई ही एक्‍स्प्रेस बिदरपर्यंत पळविण्यात आली आहे. या रेल्वे विस्तारीकरणाच्या विरोधात लातूर एक्‍स्प्रेस बचाव कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. ५) लातूर बंदचे आयोजन करण्यात आले होते. या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. येथील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कडकडीत बंद पाळला. या रेल्वे विस्तारीकरणाला सर्वच घटकांनी विरोध केला. बंदचे आवाहन करणाऱ्या २२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले. आता ता. नऊ मे रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याची समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे.

गेल्या दहा वर्षापासून लातूर एक्‍स्प्रेस ही रेल्वे फायद्यात आहे. क्षमतेपेक्षा दीडपट प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत. असे असताना बिदरकरांनी ही रेल्वे पळवली. येत्या काही महिन्यांवर कर्नाटकामध्ये निवडणुका होत आहेत. ती डोळ्यांसमोर ठेवून बिदरचे खासदार भगवंत खुब्बा यांनी ही रेल्वे पळवली आहे. त्यामुळे लातूरकरांनी आंदोलन सुरु केले आहे. यात शुक्रवारी लातूर बंदचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊपासूनच लातूर एक्‍स्प्रेस बचाव कृती समितीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या भागात गटागटाने बंदचे आवाहन करीत फिरत होते. त्यांच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे हा कडकडीत बंद झाला. 

शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई परिसर, भुसार लाईन, कापड लाईन, सराफ लाईन, भांडे गल्ली, मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ, नंदी स्टॉप, रेणापूर नाका, नांदेड नाका, राजीव गांधी चौक आदी भागात हा बंद कडकडीत पाळण्यात आला. सकाळी येथील बसस्थानकात समितीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन बस बंद करण्याची विनंती केली. त्यानंतर काही वेळ बस बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. हा बंद करणाऱ्या २२ कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले.  शहरात बंदच्या काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लातूर बंद यशस्वी झाल्यानंतर आता ता. नऊ मे रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याची आता जय्यत तयारी करण्यात येत आहे.