लातूरात सत्ता गमावलेल्या काँग्रेसमधून आऊटगोईंग होणार

Ashok Chavan
Ashok Chavan

लातूर : नगरपालिकेच्या पाठोपाठ जिल्हा परिषदेची सत्ता गमावलेल्या काँग्रेसमधून आगामी महापालिकेच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात 'आऊटगोईंग'च्या चर्चेला लातूरमध्ये ऊत आला आहे. काँग्रेसचे नगरसेवक व शेकडो कार्यकर्ते भाजपच्या तंबूत शिरण्याच्या तयारीत असून भाजपने ही त्यांच्या स्वागतासाठी लाला गालिचा अंथरला आहे. महापालिकेत आणखी एक धक्का देत लातूरला काँग्रेसमुक्त करण्याचा दिशेने भाजपने टाकेलेले हे आणखी एक पाऊल असल्याचे बोलले जाते. 

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरची धुरा सांभाळल्यापासून भाजपला प्रत्येक निवडणुकीत यश मिळाले आहे. नगरपालिकेतील विजयाचा जल्लोष कमी होत नाही तोच जिल्हा परिषदेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेसला जोरदार झटका दिला. नगरपालिकेनंतर, जिल्हा परिषदेत देखील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भाजपवासी झाले होते. भाजपची लाट पाहता महापालिकेत काँग्रेसचा टिकाव लागणार नाही, याचा अंदाज बांधत अनेक नगरसेवकांनी कमळ हाती घेण्याचे ठरवले आहे. येत्या काही दिवसांत लातूर शहरात काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचे प्रवेश सोहळे पहायला मिळतील असे चित्र आहे. 

जिल्हा परिषदेच्या 58 पैकी 36 आणि दहापैकी सात पंचायत समित्यांत भाजपने बहुमत मिळवले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. अशावेळी त्यांना पक्षात घेऊन महापालिकेची मोर्चे बांधणी संभाजी पाटील निलंगेकर करत आहेत. जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर यांचा झालेला पराभव काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणातून झाल्याची टिका काँग्रेसमधूनच होत असल्याने ही खदखद पक्ष फुटीच्या माध्यमातून बाहेर पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. एप्रिलमध्ये महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. सध्या महापालिका काँग्रेसच्या ताब्यात असून काँग्रेसचे सार्वाधिक 59 नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादीचे 13, शिवसेनेचे सहा आणि रिपाइंचे दोन सदस्य आहेत. 

सत्ता आणि खाते उघडण्यासाठी भाजप सज्ज 
विद्यमान महापालिकेत भाजपचा एकही सदस्य नाही. त्यामुळे भाजपला खाते तर उघडायचेच आहे. पण पहिल्याच झटक्‍यात महापालिकेची सत्ता देखील मिळवायची आहे. जिल्हा परिषदेत करुन दाखवल्यानंतर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा आत्मविश्‍वास प्रचंड बळावला आहे. त्या जोरावर जिल्ह्यात उरली-सुरली काँग्रेस संपवण्याचा निर्धार भाजपने केल्याची चर्चा आहे.

महापालिकेत सत्तांतर होणार असे आडाखे काँग्रेससह राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकांनी बांधले आहे. त्यामुळे भाजपात प्रवेश करून आपल्या प्रभागातील दावेदारी कायम ठेवण्यासाठी दोन्ही पक्षाचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. या 'इनकमिंग' मागे सर्व जागांवर उभे करण्यासाठी सक्षम उमेदवार भाजपकडे नसणे हे देखील एक कारण आहे. संभाजी पाटील निलंगेकर व शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या पुढाकाराने माजी महापौर अख्तर शेख यांनी अगोदरच भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचे राजकीय बळ वाढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com