विलासराव अन्‌ गोपीनाथरावांची उणीव भासणारी निवडणूक 

हरी तुगावकर - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

लातूर - कॉंग्रेसचे नेते विलासराव देशमुख व भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची राजकारणापलीकडली मैत्री राज्याने पाहिली; पण या दोन्ही नेत्यांनी निवडणुकांत मात्र एकमेकांवरील टीका करण्याचे सोडले नाही. आपल्या शैलीत ते एकमेकांचा समाचार घ्यायचे. त्याला जिल्हा परिषदेची निवडणूकही अपवाद राहत नसे. त्यांची भाषणे नागरिकांसाठी पर्वणीच असायची; पण यावेळेसची जिल्हा परिषदेची निवडणूक ही विलासराव अन्‌ गोपीनाथरावांची उणीव भासणारी ठरत आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यावेळेसचा उत्साह पाहायला मिळत नाही. दोन्ही पक्षांना या नेत्यांची उणीव मात्र जाणवताना दिसत आहे. 

लातूरहून विलासराव देशमुख आणि रेणापूरहून गोपीनाथ मुंडे हे अनेक वर्षे सूत्र चालवीत राहिले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपत हे दोन्ही नेते मोठे झाले. राज्यातच नव्हे, तर देशातला राजकीय फड त्यांनी गाजवला. कर्तृत्वाच्या जोरावर हे दोन्ही नेते मोठे झाले. अडचणीच्या काळात एकमेकांना कशापद्धतीने मदत केली जाऊ शकते हे नेहमीच लातूरकरांनी पाहिले. दोन्ही नेत्यांकडे अभिजात वक्तृत्व शैली होती. दोघांच्या सभोवती कार्यकर्त्यांचा गराडा असायचा. कॉंग्रेसमध्ये विलासरावांचे, तर भाजपमध्ये गोपीनाथरावांचे नेतृत्व वजनदार असल्याने कार्यकर्ते बिनधास्त असायचे. उमेदवारांची योग्य निवड ते करायचे. रात्रीचा दिवस करायलाही त्यांनी मागे पाहिले नाही. त्यातल्यात्यात गोपीनाथरावांच्या तर सभा पहाटेपर्यंत चाललेल्या अनेकांनी पाहिल्या. त्यांची वाट पाहत रात्रभर कार्यकर्ते जागत असत. निवडणुकीच्या काळात हे दोन्ही नेते आपल्या शैलीत एकमेकांचा समाचार घ्यायचे. नाराज कार्यकर्त्यांना आपलेसे कसे करायचे हे त्या नाराज कार्यकर्त्यालादेखील कळत नसे. त्यामुळे त्यांनी शब्द टाकल्यानंतर नाराज कार्यकर्तेदेखील कामाला लागत.

लातूरमध्ये भाजपचे काही उमेदवार विजयी व्हायचे; पण कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपला झेंडा मात्र कधीच रोवता आला नाही. 25 वर्षे जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसराज राहिले. या दोघांची राजकारणाची सुरवात जशी एकदाच झाली तशीच "एक्‍झिट'ही एक-दीड वर्षाच्या फरकाने झाली. त्यामुळे यावेळेसची जिल्हा परिषदेची ही निवडणूक या दोन्ही नेत्यांच्या अनुपस्थितीत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत सभाही गाजताना दिसून येत नाहीत.