जिल्ह्यात 138 मतदान केंद्रे संवेदनशील 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

लातूर - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लागणारा बंदोबस्त, केल्या जाणाऱ्या प्रतिबंधक कारवाया या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी रविवारी (ता. पाच) आढावा घेतला. जिल्ह्यात पोलिसांच्या दृष्टिकोनातून 138 मतदान केंद्रे संवेदनशील असून तेथे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचना डॉ. राठोड यांनी दिल्या आहेत. 

लातूर जिल्हा परिषद व दहा पंचायत समितीची निवडणूक होत आहे. यासाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. तसेच प्रशासनानेही जय्यत तयारी सुरू केली आहे. ही निवडणूक शांततेत व्हावी यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त राहणार आहे. जिल्ह्यात एक हजार 490 मतदान केंद्रे असणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी कसा पोलिस बंदोबस्त ठेवला जावा, याचा आढावा डॉ. राठोड यांनी रविवारी (ता. पाच) घेतला. पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

जिल्ह्यात मतदान व्यवस्थित पार पडण्यासाठी एक हजार आठशे पोलिस कर्मचारी लागणार आहेत. अन्य जिल्ह्यांतून 250 कर्मचारी मिळण्याची शक्‍यता आहे. दोन एसआरपी प्लाटूनची जिल्ह्यासाठी मागणी करण्यात आली आहे. होमगार्डस्‌चीही मोठी मदत घेतली जाणार आहे. हे मतदान शांततेत व्हावे यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया कराव्यात, तसेच अवैध दारू बाळगणाऱ्यांवरही कारवाई करावी अशा सूचना डॉ. राठोड यांनी दिल्या आहेत.