एकोणीस गावांच्या पाणी योजना सौरऊर्जेवर चालणार

विकास गाढवे
रविवार, 10 सप्टेंबर 2017

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणातर्फे जिल्ह्यात विविध प्रकल्प; सौर कृषी वाहिनीही सुरू करणार

लातूर - महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जाच्या (मेडा) वतीने जिल्ह्यात सौरऊर्जेचे विविध प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. यात जिल्ह्यातील १९ गावाच्यां पाणी योजनांसाठी सौरऊर्जा प्रकल्पातून वीज उपलब्ध करून देण्यासाठी मेडाने तयारी सुरू केली आहे. यासोबत शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना जास्त काळ वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून तीन ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे नियोजन मेडाने केल्याची माहिती मेडाचे पुण्यातील वरिष्ठ महाव्यवस्थापक उमाकांत पांडे यांनी ‘सकाळ’ला दिली.

मेडाच्या वतीने अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी विविध योजना राबवण्यात येतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला प्राधान्य दिले आहे. यातूनच मेडाच्या माध्यमातून विविध योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.
यात ग्रामीण भागातील पाणी योजनांसाठी सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून देण्यासाठी योजना हाती घेण्यात आली आहे.

आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या ग्रामपंचायतीसाठी ही योजना असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेतून पाणी पुरवठ्याची विहीर खोदलेल्या गावांनाही या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. काही हातपंपांवरही ही योजना कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. या योजनेसाठी एकट्या लातूर जिल्ह्यासाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध झाला असून जिल्हा परिषदेने योजनेसाठी १९ गावांची यादी दिल्याचे श्री. पांडे यांनी सांगितले. यादीनुसार सर्वेक्षण करून गावांच्या पाणी योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. येत्या मार्चपूर्वी सर्व गावांत ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. यामुळे ग्रामपंचायतीची पाणी योजनांच्या वीजबिलातून कायमची सुटका होणार आहे.

तीन ठिकाणी कृषी वाहिनी
शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना आठ तासच वीजपुरवठा होता. वीजपुरवठ्याचा कालावधी वाढवून त्याचा भार शेतकऱ्यांवर पडू न देण्यासाठी सरकारने महाजनकोच्या सहकार्यातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे. या योजनेत महावितरणच्या उपकेंद्रातून गेलेल्या वाहिनीला (फिडरला) सौरऊर्जा प्रकल्पातून निर्माण झालेली वीज पुरवठा केली जाणार आहे. निलंगा तालुक्‍यात एक व औसा तालुक्‍यात दोन ठिकाणी अशा वाहिन्या उभारण्याचे नियोजन आहे. एका वाहिनीच्या सौर प्रकल्पासाठी पाच ते दहा एकर जमीन आवश्‍यक असून या जमिनीचा शोध घेण्यात येत असल्याचे श्री. पांडे यांनी सांगितले.

लातूरला विभागीय कार्यालय
मेडाचे औरंगाबाद येथे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत मराठवाड्यातील आठ जिल्हे येतात. येत्या काळात मराठवाड्यात मेडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना राबवण्यात येणार आहेत. यामुळेच औरंगाबाद कार्यालयाचे विभाजन करून लातूर येथे स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नव्याने सुरू होणाऱ्या लातूर विभागीय कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांचा समावेश असणार असल्याचे श्री. पांडे यांनी सांगितले. नव्या कार्यालयासाठी लातुरात जागेचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.