लातूर जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्र बंद

प्रशांत शेटे 
रविवार, 10 सप्टेंबर 2017

यूआयडी - सीएमएस कंपनीचा करार संपुष्टात, नागरिकांचे हाल

चाकूर - युआयडी व सीएमएस कंपनी यांच्यातील आधार नोंदणीचा करार संपुष्टात आल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून आधार नोंदणी बंद झाली आहे. शासनाकडून सर्व योजनांसाठी आधारकार्ड मागविण्यात येत असताना सध्या जिल्ह्यात कोठेही आधारकार्ड काढले जात नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

यूआयडी - सीएमएस कंपनीचा करार संपुष्टात, नागरिकांचे हाल

चाकूर - युआयडी व सीएमएस कंपनी यांच्यातील आधार नोंदणीचा करार संपुष्टात आल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून आधार नोंदणी बंद झाली आहे. शासनाकडून सर्व योजनांसाठी आधारकार्ड मागविण्यात येत असताना सध्या जिल्ह्यात कोठेही आधारकार्ड काढले जात नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

युआयडी व सीएमएस कंपनी यांच्यातील करारानुसार जिल्ह्यात ८५ महा- ई सेवा केंद्रात आधार नोंदणी केली जात होती. सदरील कंपनीचा करार संपुष्टात आल्यामुळे तीन महिन्यांपासून आधार नोंदणी बंद करण्यात आली आहे. ही आधार केंद्रे महाऑनलाईनसोबत करार करून चालू केली जाणार होती; परंतु यात काही अडचणी येत असल्याचे सांगून आधार नोंदणीचे काम सुरू झालेले नाही. शासनाने लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आधारची सक्ती केली आहे. हाताचे ठसे न आल्यामुळे अनेकांचे आधारकार्ड निघालेले नाही.

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचे आहे; परंतु अनेक जणांकडे आधारकार्ड नसल्यामुळे त्यांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान (कर्जमाफी) योजनेसाठी आधारकार्ड अनिवार्य असल्यामुळे वृद्ध शेतकरी आधारकार्ड काढण्यासाठी भटकंती करीत आहेत. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे; परंतु सध्या आधार नोंदणी बंद असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आधारकार्ड गरजेचे आहे.

जिल्ह्यात तीन खासगी केंद्रांवर आधारची नोंदणी सुरू असून या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना त्या ठिकाणी जाऊन आधारकार्ड काढावे लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जिल्ह्यात सर्वत्र आधारनोंदणी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यासाठी नव्याने महाऑनलाईनसोबत करार झालेला आहे. यासंबंधीची कागदपत्रे घेण्यात आलेली असून महाऑनलाईनसाठी जिल्हा समन्वयक नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिक आधार नोंदणीसाठी तीन महिन्यांपासून हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व केंद्रे लवकर सुरू होणे गरजेचे आहे.
- मनोज गुळवे, जिल्हाध्यक्ष, महा- ई सेवा केंद्र युनियन