भिवंडीच्या आरोपीस सहा दिवसांची कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

लातूर - येथील बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज प्रकरणात पोलिसांच्या पथकाने भिवंडी येथे जाऊन युनूस इफ्तेयाज आझमी याला अटक केली. येथील न्यायालयाने त्याला सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश गुरुवारी दिला. आझमी याने या प्रकरणात येथे अटक करण्यात आलेल्या आरोपींना सिमकार्ड पुरविल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच त्याच्याकडून इतर माहितीही मिळणार आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.

बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज प्रकरणात पोलिसांनी हैदराबाद येथील धागेदोरे उघडकीस आणले. या प्रकरणात भिवंडी येथेही असेच एक्‍स्चेंज उघडकीस आले होते. तेथील भोईवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणात पोलिसांनी युनूस आझमी याला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवले होते. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या सूचनेनुसार उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक भिवंडीला गेले होते. तेथे त्यांनी युनूसला अटक करून लातूरला आणले.