घटना बदलण्याचा भाजपचा डाव - ऍड. प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

लातूर - मोदी सरकार आरक्षणविरोधी; तसेच घटनेच्या विरोधात काम करणारे सरकार आहे. त्यांना घटनेत बदल करायचा आहे; पण सध्या राज्यसभेत बहुमत नाही. त्यांना 2022 मध्ये राज्यसभेत बहुमत मिळण्याची शक्‍यता आहे. असे झाल्यास घटनेत बदल करण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (ता. 28) पत्रकार परिषदेत केला.

ऍड. आंबेडकर म्हणाले, 'भाजप व संघाचा स्वतःचा वेगळा अजेंडा आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने ओळखले आहे. त्यामुळे विविध प्रकरणांत न्यायालयाने पंतप्रधानांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच पक्षाचे नव्हे, तर देशाचे पंतप्रधान आहात अशी आठवण मोदींना करून दिली, त्यामुळे त्यांनी या खुर्चीवर राहावे की नाही ते ठरवावे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागा, मागासवर्गीयांची पदोन्नती, शिष्यवृत्तीचा प्रश्न या सर्व प्रकरणांतील त्यांची भूमिका आरक्षणविरोधी आहे. राज्य सरकारही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहे. कर्जमाफीचा केवळ देखावा केला गेला आहे. प्रत्यक्षात लाभ नाही.''

'देशातील कॉंग्रेसला नेतृत्वच नसल्याने ती कोमातून बाहेर पडेल असे वाटत नाही. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद प्रसाद यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने ते पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत. पण त्यांनी भाजपच्या विरोधात ठोस भूमिका घेऊन काढलेल्या रॅलीत कॉंग्रेस नेतृत्वाने सहभागी होणे आवश्‍यक होते,'' असेही त्यांनी सांगितले.

Web Title: latur marathwada news BJP to change the incident