ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते उद्या विविध वीज विकासकामांचे भूमिपूजन

ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते उद्या विविध वीज विकासकामांचे भूमिपूजन

लातूर - ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे गुरुवारी (ता. २९) जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात महावितरणकडून करण्यात येणाऱ्या विविध वीज विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. यात दीनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत बोरगाव काळे (ता. लातूर), हगदळ, खंडाळी (ता. अहमदपूर), सिरसी हंगरगा (ता. निलंगा), लोदगा (ता. औसा) तर लातूर एमआयडीसीतील आयपीडीएस योजने अंतर्गत एका वीज उपकेंद्राचे भूमिपूजन होईल.

या सहाही उपकेंद्रांतून प्रत्येकी तीन अकरा केव्ही वीज वाहिन्या व त्यांवरून लघुदाब वाहिन्यांमार्फत वीज वितरण होणार असल्याने ग्राहकांना अधिक चांगल्या आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा होणार आहे. या कामावर तेरा कोटी ४२ लाख रुपये खर्च करण्यात येत असून ही कामे पुढील वर्षात पूर्ण होणार आहेत. या उपकेंद्राचा लाभ शहर आणि एमआयडीसी, रामेगाव, बोरगाव, निवळी, मसोबावाडी, तळीखेड, शिरशी हंगरगा, हंगरगा, सावनगीर, माकणी, लोदगा, भुसणी, होळी, कवठा, गोंद्री, तोंडवळी, खंडाळी, नरवटवाडी, दासवाडी, वंजारवाडी, जोडवाडी, नाईकनगर तांडा, बुधना तांडा, उद्धव तांडा, हगदळ, घुगदळ, वरवटी, वरवटी तांडा, रुई, रुई तांडा, शिंदगी, ज्योतीबा तांडा व आडगा गावांना होणार आहे. प्रमुख कार्यक्रम महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात होणार आहे. 

भूमिपूजन कार्यक्रमानंतर ऊर्जामंत्री बावनकुळे हे त्याच ठिकाणी लोकांच्या विजेसंबंधीच्या तक्रारी स्वीकारणार आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रात ऊर्जामंत्र्यांची खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक यांच्यासमवेत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. सायंकाळी सहा वाजता महापारेषणच्या जळकोट येथील २२०/१३२ केव्ही तर दोन १००/२ एमव्हीए अतिउच्च दाब क्षमतेच्या उपकेंद्राचेही भूमिपूजन ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com