कर्जमाफीच्या आदेशात शेतकऱ्यांचा विश्वासघात - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

लातूर - कर्जमुक्तीसंदर्भातील आदेशात निकष टाकून राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शब्दांचा खेळ करीत शेतकऱ्यांत भेदभाव केला आहे. या आदेशामुळे गरजू शेतकरीही वंचित राहतील. सरसकट कर्जमाफी दिली जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा इशारा पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.

पवार म्हणाले, 'कर्जमाफीमुळे बॅंकांचा फायदा होईल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील का? ठराविक विभागालाच फायदा मिळेल, शाश्वत शेती कशी करता येईल याचा प्रयत्न केला जाईल, अशा वल्गना सरकारकडून करण्यात आल्या. संपाच्या वेळी फूट पाडण्याचाही प्रयत्न सरकारने केला; पण शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारचे डोळे उघडले, त्यातून कर्जमुक्तीची घोषणा केली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरसकट शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली जाईल, असे जाहीर केले होते; पण दहा हजार रुपये देण्यासंदर्भात एक आदेश काढला आहे. त्यात अनेक निकष टाकण्यात आल्याने गरजू शेतकरीही त्यापासून वंचित राहतील. हे निकष ठरविताना विरोधी पक्ष, शेतकरी संघटनांना विश्वासात घेतलेले नाही.''

गुळाला चिकटलेले मुंगळे
'सत्तेत राहून शिवसेना भाजपला सातत्याने धमकी देत आहे. राजकीय सभ्यताच राहिलेली नाही. पंधरा वर्षांनंतर हे दोन्ही पक्ष सत्तेत आलेले, हे गुळाला चिकटलेले मुंगळे आहेत. त्यामुळे ते सत्तेच्या बाहेर पडणार नाहीत. त्यामुळे मध्यावधी निवडणूक होईल असे वाटत नाही. मध्यावधी निवडणूक झाली तर आमचा पक्ष सज्ज आहे,'' असे अजित पवार म्हणाले.