आरोपीला पकडण्यासाठी पोलिस भिवंडीला रवाना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

लातूर - येथे उघडकीस आलेल्या बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज प्रकरणाचे आता भिवंडीशी असलेले धागेदोरे समोर येत आहे. तेथेही असेच एक एक्‍स्चेंज उघडकीस आले असून, त्यातील आरोपीचे लातूरशी संबंध आहे. त्यामुळे येथील पोलिसांचे एक पथक भिवंडीला त्या आरोपीला आणण्यासाठी रवाना झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या दोन संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

गेल्या महिन्यात येथील प्रकाशनगर व औसा रस्ता भागात दोन बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आणखी दोन एक्‍सचेंज उघडकीस आणले. यात पोलिसांनी पहिल्यांदा हैदराबाद "कनेक्‍शन' उघडकीस आणून तेथून दोघांना अटक केली. गेल्या वीस दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत आहे. दहशतवादविरोधी पथक, सीआयडी, आयबी, तसेच स्थानिक पोलिस याचा तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवादविरोधी कक्षाकडून पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्याकडे देण्यात आला होता.