संत साहित्यामध्ये समाज सुधारण्याची ताकद - सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

लातूर - पैशाने आर्थिक दारिद्य्र दूर करता येईल; पण मानसिक दारिद्य्र दूर करता येणार नाही. संत साहित्यात समाजसुधारणा, मानसिक दारिद्य्र दूर करणे, आनंदी ठेवण्याची ताकद आहे. त्यामुळे
संत साहित्यातील विचारांतूनच महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

लातूर - पैशाने आर्थिक दारिद्य्र दूर करता येईल; पण मानसिक दारिद्य्र दूर करता येणार नाही. संत साहित्यात समाजसुधारणा, मानसिक दारिद्य्र दूर करणे, आनंदी ठेवण्याची ताकद आहे. त्यामुळे
संत साहित्यातील विचारांतूनच महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे आयोजित सहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आज मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. गहिनीनाथ महाराज औसेकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, आमदार विनायक पाटील आदी उपस्थित होते.

या वेळी वारकरी संप्रदायासाठी अमूल्य कार्य केलेल्या श्रीगुरू भगवान महाराज शिवणीकर यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला. वारकरी संप्रदायाची विशेष सेवा केल्याबद्दल ज्ञानेश्‍वर महाराज
जळगावकर यांना वाहन प्रदान करण्यात आले. "संतकृपा' स्मरणिकेचे प्रकाशनही झाले.

मुनगंटीवार म्हणाले, सरकारच्या मागे संतांनी फिरण्याची गरज नाही. सत्ता किंवा सरकारच्या मागे संत नसेल तर सरकार कामच करू शकणार नाही. शेतकरी हा आपल्या पोटाची भूक क्षमवतो, तर वारकरी व संत साहित्य हे आपल्या मनाची भूक भागवितात. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर शेतकऱ्यांप्रमाणेच वारकऱ्यांचाही अधिकार आहे. त्यामुळे तुम्हाला अर्थमंत्री म्हणून नव्हे तर विठ्ठलाचा भक्त म्हणून सर्व मदत करण्यात येईल.

'पर्यावरणपूरक वारी व्हावी'
पंढरीच्या निर्मलवारीसाठी जास्तीचे तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या वर्षीची वारी पर्यावरणपूरक झाली पाहिजे. आपल्या प्रबोधन, कीर्तन, प्रवचन, मनोगत, भाष्यातून वृक्ष लागवड व पर्यावरणाचा संदेश द्यावा, असे आवाहन मुनगंटीवार यांनी या वेळी केले.

लातूर - महाराष्ट्र वारकरी परिषदेतर्फे सोमवारी झालेल्या सहाव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (मध्यभागी) व गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा वारकरी फेटा बांधून, घोंगडी व तुळशीवृंदावन देऊन सत्कार करण्यात आला.