लातूर - सतत दोन वर्षे झालेला चांगला पाऊस, काळ्या आईच्या कुशीत उभारी घेत असलेली रब्बीची पिके, हिरवीगार झालेली रानं, अशा प्रसन्न वातावरणात सोमवारी (ता. 17) जिल्ह्यात वेळा अमावास्या उत्साहात साजरी करण्यात आली. या सणाच्या निमित्ताने बळिराजाकडून काळ्या आईचे मनोभावे पूजन करण्यात आले. आप्तेष्ट, मित्रांना शेतात बोलावून वनभोजनाचा आनंदही सर्वांनी घेतला. या सणाच्या निमित्ताने शहरात मात्र शुकशुकाट राहिला; रानं फुलली होती.
वेळा अमावास्या हा ग्रामीण संस्कृतीचा सण आहे. शेतकरी व शेतीशी निगडित सर्व कुटुंबीय हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. सोमवारी वेळा अमावास्या होती. सकाळपासून प्रत्येक घरात शेतात जाण्याची घाईगडबड सुरू झाली. सकाळी दहा-अकरा वाजता शहरात शुकशुकाट; तर शेतं मात्र गजबजली होती. स्वतःची वाहने, तसेच मिळेल त्या वाहनाने नागरिक शेतात जाताना दिसून येत होते. यातूनच एसटी महामंडळाच्या बसला गर्दी होती. खासगी वाहतूक करणारी वाहनेही प्रवाशांनी तुडुंब भरून जाताना दिसत होती.
|