लातूरच्या 16 नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांकडून तूर्तास अभय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

लातूर - लातूर महापालिकेची निवडणूक येत्या काही दिवसांवर आली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या विद्यमान 16 नगरसेवकांना अभय दिले आहे. त्यामुळे या नगरसेवकांवर असलेली अपत्रातेची टांगती तलवार तूर्तास बाजूला गेली आहे; तर दुसरीकडे रडीचा डाव खेळण्यापेक्षा ताकदीने महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जा, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

लातूर - लातूर महापालिकेची निवडणूक येत्या काही दिवसांवर आली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या विद्यमान 16 नगरसेवकांना अभय दिले आहे. त्यामुळे या नगरसेवकांवर असलेली अपत्रातेची टांगती तलवार तूर्तास बाजूला गेली आहे; तर दुसरीकडे रडीचा डाव खेळण्यापेक्षा ताकदीने महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जा, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत येथील एका मंदिराला रस्त्यावर शेड उभारणीसाठी मंजुरी देणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर रस्त्यावरच शेडची उभारणी झाली होती. अशा पद्धतीने ठराव करणे हे बेकायदेशीर होते. या स्थायी समितीत 16 सदस्य आहेत. यांतील

बहुतांश सदस्य हे कॉंग्रेसचे आहेत. हे प्रकरण भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर धुतेकर यांच्या हाती लागले. त्यानंतर श्री. धुतेकर यांनी या प्रकरणी शासनाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन शासनाने महापालिकेच्या आयुक्तांकडून अहवाल मागवला होता. आयुक्तांनी सर्व चौकशी करून हा अहवाल शासनाला काही दिवसंपूर्वी पाठवला होता. नगर विकास विभागाने या अहवालावर आपले मतही मांडले होते. त्यामुळे या प्रकरणात 16 जणांवर अपात्रतेची टांगती तलवार होती. नगरसेवकांच्या अपात्रतेची ही फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर होती. श्री. धुतेकर काही दिवसांपासून याचा शासनाकडे पाठपुरावाही करत होते.

यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी श्री. धुतेकर यांना बोलावून, या अहवालावर चर्चा केली. महापालिकेची निवडणूक येत्या काही दिवसांवर आली आहे. आपला पक्ष राज्यात व देशात चांगले काम करीत आहे. त्यामुळे असे नगरसेवकांना अपात्र करून रडीचा डाव खेळण्यापेक्षा येणाऱ्या निवडणुकीला ताकदीने सामोरे जा. जी काही मदत लागेल, ती मी तुम्हाला द्यायला तयार आहे. स्वतः आपण लातूरला येणार आहोत, असे सांगून श्री. फडणवीस यांनी ही फाईल बाजूला ठेवली आहे. ही फाईल पूर्णतः बंद झालेली नाही; त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर तरी किमान या नगरसेवकांवरील अपात्रतेची टांगती तलवार तूर्तास दूर झाली आहे.

'मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याला बोलावून घेतले होते. या प्रकरणाची सविस्तर चर्चा झाली.

नगरसेवकांवर कारवाई करून महापालिका आणण्यापेक्षा निवडणुकीत ताकदीने लढण्याचा त्यांनी सल्ला दिला आहे. तसेच निवडणुकीत स्वतः येऊन ताकद देण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदेश शिरसावंद्य मानून, भाजप निवडणुकीला सामोरे जाईल.''
- सुधीर धुतेकर, तक्रारदार व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य.

Web Title: latur municipal support by devendra fadnavis