'बेटी बचाओ- बेटी पढाओ' योजनेच्या नावाखाली हजारो लोकांची फसवणूक

उदयकुमार जोशी
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

खोट्या अर्जाचा शहरात धुमाकूळ. दोन लाख मिळण्याचे आमिष. हजारो फसले.

अहमदपूर : सद्यस्थितीत शहरात 'बेटी बचाओ- बेटी पढाओ' असा छापलेला अर्ज मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. हा अर्ज भरून दिल्ली येथे पाठवल्या नंतर मुलीच्या खात्यात दोन लाख रूपये जमा होतात, अशी अफवा पसरवल्या गेल्याने नागरिक व तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हा अर्ज भरून दिल्ली येथे पाठवत आहेत.  

वय वर्षे सहा ते 32 वर्षे वय असलेल्या मुलींच्या नावाने हा अर्ज भरावयाचा असून, सोबत सदर मुलीच्या आधार कार्डचा नंबर तसेच बँक खाते क्रमांक लिहावयाचा आहे. वय व शिक्षणाचा पुरावा  देण्यासाठी शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा टी.सी.ची झेरॉक्स प्रत  जोडावयाची आहे. शिवाय सदर मुलगी ग्रामीण भागातील असल्यास त्यावर सरपंचाची व शहरातील असल्यास नगरसेवकाची स्वाक्षरी असणेही गरजेचे आहे. 

सुरवातीला हा अर्ज शहरातील एकाच झेरॉक्स सेंटरवर मिळत होता.त्यावेळी तो चाळीस रूपयास एक या दराने विकला गेला.आता तो शहरातील विशेषतः तहसील कार्यालयासमोरील बहुतांश झेरॉक्स सेंटर मधून दहा रूपयास एक या दराने विकला जात आहे. सध्या शाळा व महाविद्यालयातून बोनाफाईड सर्टिफिकेट काढण्यासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.त्यामुळे मुख्याध्यापकांचेही काम वाढले आहे. हा अर्ज भरून  'भारत सरकार, महिला एवं बाल विकास मंत्रालय, शांती भवन, नई दिल्ली- 110001'येथे रजिस्टर्ड ए.डी.ने पाठवला जात आहे. यामुळे पोस्टातही सध्या रजिस्ट्री करणा-यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलीआहे. त्यामुळे पोस्ट खात्याचे काम आणि उत्पन्न दोन्हीही वाढले आहे.                                             खरेच दोन लाख मिळणार असतील तर संधी कशाला सोडा असा विचार करून, कसलीही खातरजमा न करता हा अर्ज भरून पाठवणा-यां मध्ये सुशिक्षित लोकांचाही यात भरणा झालेला दिसून येतो आहे. या अर्जा सोबत संबंधिताच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत तसेच फोटोही जोडण्या बाबत सूचित करण्यात आले आहे. कदाचित या दोन्हीही बाबींचा भविष्यात गैरवापर केला जाऊ शकतो, ही बाब संबंधित लक्षात घेत नसल्याचे स्पष्ट होते आहे.  

सदर अर्जाची शहरात मोठ्या प्रमाणात विक्री करून फसवणूक केली जात असतानाही शासकीय यंत्रणा, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांची याकडे डोळेझाक होताना दिसत आहे. हे अर्ज विकणा-या झेरॉक्स सेंटरच्या चालकांवर तातडीने कारवाई होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.   

काय आहे 'बेटी बचाओ बेटी पढाओ' योजना?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा येथे 22 जानेवारी,2015 रोजी 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या योजनेची घोषणा केली. स्त्री जातीच्या अर्भकाची भ्रुणहत्या थांबावी, मुलींना सुरक्षा व शिक्षण मिळावे हा या योजने मागचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्टात 'सुकन्या समृद्धी योजना' हे खाते सुरू करावयाचे आहे. हे खाते सुरूवात करताना मुलीचे वय दहा वर्षापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. या खात्यात सदर मुलीच्या आई- वडीलांनी किंवा पालकांनी वर्षभरात कमीतकमी एक हजार तर जास्तीत जास्त दीड लाख रूपये जमा करावयाचे आहेत. सदर खाते सुरूवात झाल्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी याची मुदत संपते.त्यानंतरच यातील रक्कम मिळू शकते. मात्र मुलीच्या वयाचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर जमा रकमेच्या निम्मी रक्कम तिच्या उच्चशिक्षणासाठी किंवा लग्नासाठी काढता येते.सुरवातीला या खात्यातील रकमेवर व्याजदर जास्त होता.सन 2017-18 साठी तो 8.4 टक्के एवढा निर्धारित करण्यात आला आहे.