केंद्रीय राखीव पोलिस दलाचा दीक्षांत सोहळा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

लातूर - मांजरा कारखाना परिसरातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) प्रशिक्षण केंद्रात शनिवारी (ता. पाच) आयोजित दीक्षांत सोहळ्यानंतर केंद्रातील 170 जवानांची तुकडी देशसेवेत रुजू झाली. रोमहर्षक कार्यक्रमात जवानांनी केलेल्या शिस्तबद्ध पथसंचलनासह मल्लखांब व जुदो कराटेची प्रात्यक्षिके साद करून उपस्थितांची मान देशाभिमानाने उंचावली. 

"पॅरा मिलीटरी' अशी ओळख असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत जवानांच्या बारा तुकड्या प्रशिक्षण घेऊन देशसेवेत रुजू झाल्या आहेत. तेराव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा शनिवारी केंद्राचे प्राचार्य तथा सीआरपीएफचे पोलिस महानिरीक्षक डॉ. डी. के. सिंह व मुख्य प्रशिक्षण अधिकारी आर. टी. वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 44 आठवड्यांच्या दीर्घ कालावधीत जवानांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले. यातून जवान कठीण आणि कसरतीने परिपूर्ण अशा प्रशिक्षणात निपुण झाल्याचे दिसून आले. जवानांना विविध मापदंड आणि शिस्तींचे पालन करणे, कठीण व दुर्गम भागात येणाऱ्या आव्हानांचा सामना करणे व राष्ट्रीय अखंडतेला बाधा पोचविणाऱ्या शक्तींचा मुकाबला करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. सोहळ्यात प्रशिक्षणादरम्यान विशेष प्रावीण्य दाखविणाऱ्या निवडक जवानांचा विशेष स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र डॉ. सिंह यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात बेस्ट इन डोकर म्हणून जवान जी. डी. संजीवकुमारसिंह, बेस्ट आऊटडोअर म्हणून जवान चालक अनिल कुमार, बेस्ट फायटर म्हणून जीडी मनोज कुमार आणि ऑल राऊंडर म्हणून जवान जीडी विठ्ठल घायर यांचा समावेश होता. सोहळ्यानिमित्त जवानांनी मल्लखांब व जुदो कराटेची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. यासोबतय शिस्तबद्ध पथसंचलनातून देशभक्तीचे वातावरण तयार केले. सैन्यदलातील विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.