धरण भरले, आता हवे नियोजन

धरण भरले, आता हवे नियोजन

लातूर - शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे लातूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा पाणीप्रश्न मिटला आहे. महापौर सुरेश पवार यांनी मांजरा धरणावर जाऊन जलपूजन केले. गेल्यावर्षीही हे धरण पूर्णपणे भरले होते. तरी देखील लातूरकरांना आठ-दहा दिवसातून एकदाच पाणी मिळाले. आताही धरण भरले आहे. यंदातरी नियमित पाणी मिळण्यासाठी महापालिकेने नियोजन करण्याची गरज आहे. 

दोन वर्षांपूर्वी लातूरकरांना दुष्काळाच्या मोठ्या झळा बसल्या होत्या. मांजरा धरण कोरडे पडले होते. पाणीसाठे आटले होते. मांजरा नदी कोरडी पडली होती. लातूर शहराला पाणीपुरवठा करणे अशक्‍य झालेले होते. या परिस्थितीत शहराला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती; मात्र गेल्यावर्षी परतीच्या पावसाने लातूरकरांना साथ दिली. शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण भरले होते; पण वर्षभरात या धरणातून ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाण्याचा उपसा करण्यात आला होता. धरणात केवळ २३ टक्केच पाणीसाठा होता; पण यावर्षीही परतीच्याच पावसाने लातूरकरांना साथ दिली आहे. 

गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे मांजरा धरण भरले आहे. सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के हे धरण भरले आहे. दोनच दिवसांपूर्वी धरणाचे सहा दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. धरण शंभर टक्के भरण्याने लातूर शहरास पाणीपुरवठा कमी पडणार नाही. वरुणराजाने कृपा दाखवत शंभर टक्के धरण भरले असल्याने महापौर सुरेश पवार यांच्यासह उपमहापौर देवीदास काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. निर्सगाने कृपा दाखविली असली तरी लातूरकरांनी पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे. आगामी काळात लातूरकरांना उच्चदाबाने व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.  

या प्रसंगी नगरसेवक शिवकुमार गवळी, विशाल जाधव, सुनील मलवाड, गुरुनाथ मगे, संगीत रंदाळे, भाजपचे पदाधिकारी संतोष भालेराव, गणेश हेड्डा, प्रवीण येळे, राहुल पाटील, मोहन माने, अनिल शिंदे, गणेश गोमसाळे उपस्थित होते.

तरीही आठ दिवसांतून पाणी
यंदा साई, नागझरी बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. सध्या पाण्याची कमी नाही; पण लातूरकरांना सध्याही आठ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. महापालिकेने नियोजन करून लातूरकरांना व्यवस्थित पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com