'डॉ. आंबेडकरांप्रमाणे समाजमन जागवावे लागेल'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

लातूर - घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला जागरूक करून त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याप्रमाणेच संपूर्ण समाजमन जागरूक करून त्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्याची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी रविवारी (ता. १९) येथे व्यक्त केले. 

लातूर - घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला जागरूक करून त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याप्रमाणेच संपूर्ण समाजमन जागरूक करून त्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्याची गरज आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी रविवारी (ता. १९) येथे व्यक्त केले. 

गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री. सिरपूरकर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते राष्ट्रीय न्याय पुरस्कार देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. या वेळी ते ‘भारतीय राज्यघटना, सर्वोच्च न्यायालय आणि स्त्री’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिरुद्ध जाधव होते. श्रीमती कुमकुम सिरपूरकर, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश अंबादास जोशी, प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, संस्थेचे मार्गदर्शक तथा उद्योजक अजय ठक्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांचे स्वागत पूजा ठक्कर व संस्थेचे अध्यक्ष हणमंत जगताप यांनी केले.

राज्यघटनेने सर्वांना समान हक्क दिले आहेत. या हक्काबद्दल आपण जागरूक झालो; परंतु कर्तव्याचे काय? असा सवाल त्यांनी केला. डॉ. बाबासाहेबांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्य घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला दिले, असे असताना समाजातील महिलांचे स्थान मागे पडले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळाले. महिला महत्त्वाच्या पदावर राहून काम करीत आहेत; परंतु त्यांच्या बाजूला त्यांचा पती बसतो, हे अपेक्षित नाही, अशा मार्गदर्शक सूचना मी कोलकाता न्यायालयात मुख्य न्यायाधीश असताना करून सर्व पतींचा रोष ओढवून घेतला होता. आजही या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे. महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल अशा ‘कु’प्रथांना तिलांजली देण्याची आजही गरज असल्याचे ते म्हणाले.  सूत्रसंचालन प्रा. गणेश बेळंबे यांनी केले. पत्रकार धर्मराज हल्लाळे यांनी आभार मानले.

विलासराव द्रष्टे नेते
मी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली, त्याच्या दुसऱ्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख माझ्याकडे आले. पुष्पगुच्छ देऊन मला त्यांनी शुभेच्छा दिल्या. वास्तविक पाहता मी त्यांचा सत्कार करायला हवा होता. त्या वेळी त्यांनी महाराष्ट्रावर लक्ष असू द्या, अशी विनंती केली. मी त्यांना जिल्ह्यापेक्षा मोठे असलेल्या वरोरासाठी जिल्हा न्यायालय देण्याची विनंती केली. त्या वेळी त्यांनी न्यायालय दिले. तसा शब्द देऊन तो तीन महिन्यांत कृतीत आणला. विलासराव हे द्रष्टे नेते होते. असा मुख्यमंत्री एकदाच होत असतो, असे गौरवोद्‌गार श्री. सिरपूरकर यांनी काढले.

Web Title: latur news dr babasaheb ambedkar social