माजी सरपंचाच्या खूनप्रकरणी दोघांना दहा वर्षे सक्तमजुरी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

लातूर - किरकोळ कारणावरून पळशी येथील माजी सरपंच सतीश हणमंत जाधव यांचा खून केल्याप्रकरणी दोघांना प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली. दत्ता विश्वनाथ लांडगे, नागनाथ बाबूराव इगे (दोघेही रा. रेणापूर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

खानापूर (ता. रेणापूर) भागात सह्याद्री नावाचा ढाबा आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सतीश हणमंत जाधव, धनेश्वर मोहन शिंदे (रा. पळशी) हे ढाब्याच्या आडोश्‍याला थांबले. काही वेळाने पाऊस थांबला म्हणून ते दुचाकीवरून पुढे निघणार तेवढ्यात तेथे या ढाब्यावर दारू मिळते का, अशी विचारणा आरोपींनी जाधव यांच्याकडे केली. किरकोळ कारणावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची, धक्काबुक्की झाली. इगे याने जाधव यांचे हात पकडून ठेवले, तर लांडगे याने मोठा दगड उचलून जाधव यांच्या डोक्‍यात घातला. शिंदे यांनी तातडीने जाधव यांना सुरवातीला रेणापूरमधील, त्यानंतर लातूर आणि औरंगाबादमधील खासगी दवाखान्यात दाखल केले; पण सतीश जाधव यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती देत शिंदे यांनी रेणापूर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. पोलिस अधिकारी विशाल वाघमारे यांनी तपास पूर्ण करून लांडगे आणि इगे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक दोन) ए. एन. पाटील यांच्यासमोर झाली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दहा वर्षांची सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा दिली जाणार आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ऍड. संतोष वसंतराव देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना पोलिस हवालदार आर. टी. राठोड, दिलीप नागराळे यांनी सहकार्य केले.

Web Title: latur news former Sarpanch murder case ten years imprisonment