सावधान! लातुरात भूमाफियांचा धुमाकूळ!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

लातूर - रिकामी जागा दिसली की मग ती महापालिकेची असो, अथवा सरकारी किंवा खासगी तेथे भूमाफिया टोळीने थेट शेड ठोकलेच म्हणून समजा! शहराच्या मध्यवस्तीतून पूर्वी जुनी रेल्वे पटरी गेलेली होती. माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नांतून पटरीची सर्व जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली होती. आता तेथे मोठा समांतर रस्ता करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यावरही भूमाफियांनी अतिक्रणास सुरवात केली आहे. त्यांच्याशी ‘डील’ न करणाऱ्यांच्या अगदी घरासमोर जागा असल्याचे सांगून दारातच शेड मारले जात आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून शहरात काही भूमाफिया टोळ्यांनी डोके वर काढले आहे. त्यांना जागेची संपूर्ण माहिती देण्याचे काम पालिकेतील ‘स्वच्छता दूत’च करताना दिसतात. या टोळ्यांची मुजोरी एवढी वाढली आहे की, महापालिकेतील पदाधिकारीही यांचा त्रास नको म्हणून टोळीतील सदस्याला पाच-पन्नास हजार देऊन टाका, असा उफराटा सल्ला देताना दिसतात! एखाद्याने विरोध केलाच तर ही जागा पालिकेची आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम? असा उलटा सवाल टोळ्यांकडून विचारला जातो. स्वच्छतेचे काम करतानाच हेरलेल्या घरातील प्रत्येक व्यक्तींची माहिती टोळ्यांना दिली जाते. म्हणजे त्या घरात कोण कोण असते, काय करतात, आर्थिक परिस्थिती कशी याबाबतची संपूर्ण माहिती मिळविली जाते. त्यानंतर जागेवर अतिक्रमण करताना त्या घरातील कर्ता पुरुष रुग्णालयात दाखल झाला किंवा बाहेरगावी गेला की नेमका तोच अतिक्रमणाचा ‘मुहूर्त’ टोळ्यांकडून साधला जातो.  

अशाच टोळ्यांना गेल्या आठ वर्षांपासून शिवाजीनगर भागातील काशीनाथ शेरखाने तोंड देत आहेत. महापालिकेपासून जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत ते वयाच्या ७० व्या वर्षीही दाद मागत फिरत आहेत. राष्ट्रपतींपर्यंतही त्यांनी दाद मागितली. मात्र, अतिक्रमण होणारी जागा पालिकेची, मात्र अगदी घरासमोर होत आहे, मग यंत्रणाही म्हणते, तुम्हाला त्यात काय प्रॉब्लेम? घरासमोरील जागेवर महिना दोन महिन्यानंतर पुन्हा कोणी तरी दुसरीच व्यक्ती पुढे येऊन शेड मारण्यास सुरवात करतो. जुना ७०-८० वर्षांपूर्वीचा एखादा खाडाखोड केलेला दस्त दाखवून टोळीचेच कसे बरोबर आहे, हे शेजाऱ्यांना सांगताना ‘स्वच्छता दूत’ थकत नाहीत. त्यामुळे जागामालकांनो सावधान व्हा, आपली जागा डोळ्यांत तेल घालून जपा, अशी कळकळीची विनंती करीत श्री. शेरखाने फिरत आहेत. 

इमानदारी हीच आमची चूक!
माझे सासरे गेल्या आठ वर्षांपासून सर्व सरकारी यंत्रणेकडे दाद मागत आहेत. प्रत्येकजण म्हणतो, तुमचे बरोबर आहे. येथे अतिक्रमण झालेच नाही पाहिजे, असे सांगतात. मात्र दर दोन महिन्याला एखादी दुसरीच व्यक्ती येते आणि येथे शेड मारण्यास सुरुवात करते. घरातील पुरुष बाहेरगावी गेले की हे शेड मारण्यास सुरवात करतात. मग आम्ही बाईमाणसाने किती विरोध करायचा? अतिक्रमण करताना गुंड आणून बाईमाणसांना शिवीगाळ केली जाते. मग दाद कोठे मागायची? आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीची शक्ती घरासमोर अतिक्रमण रोखण्यातच खर्ची होत आहे. आम्हाला याचा अगदी वीट आला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया रेणुका शेरखाने यांनी व्यक्त केली. 

Web Title: latur news land Mafia marathwada