महापौरांवर भाजपचा भरोसा नाय काय?

महापौरांवर भाजपचा भरोसा नाय काय?

लातूर- महापालिकेत महापौरांनी एका विषयावर बोलावली सभा त्यांच्याच पक्षाच्या सभागृह नेत्यांनी गुंडाळल्याचा प्रकार पहिल्यांदा घडला; पण यामागचे राजकारण वेगळेच दिसत आहे. सभापती ‘तात्यां’नी दिलेल्या पत्रानंतर महापौर ‘तात्यां’नी सभा घेतल्याने पक्षातील सदस्य नाराज झाले. यातूनच ही सभा गुंडाळली गेली. खरे तर सत्ताधाऱ्यांना यावर चर्चा घडवून आणता आली असती; पण 

महापौरांना तोंडघशी पाडण्यात आले. त्यामुळे महापौरांवर भाजपचा भरोसा नाय का? असे चित्र सध्या महापालिकेत निर्माण झाले आहे. 

महापालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. गुंठेवारीची मुदत दोन महिन्यांपूर्वीच संपली आहे. त्यामुळे त्याला मुदतवाढ देणे आवश्‍यक आहे. भाजपचे बहुतांश नगरसेवक नवीन आहेत. त्यांना हा विषयच माहिती नाही. त्यामुळे हा विषय त्यांच्या लक्षातच आला नाही; पण अनुभवी असलेल्या काँग्रेसचे स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर (तात्या) यांनी ता. सात नोव्हेंबर रोजी महापौर सुरेश पवार (तात्या) यांना एक पत्र दिले. महापालिकेत दोन महिन्यांपासून गुंठेवारी प्रकरणे प्रलंबित आहेत.

महापालिकेचे उत्पन्नही बुडत आहे. यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. तरी लवकरात लवकर याबाबतचा ठराव घेऊन गुंठेवारी सुरू करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली. दोन्ही तात्यांना मोठा अनुभव आहे. बांधकाम परवान्याशी हा विषय निगडित आहे. यातून महापालिकेचे उत्पन्नही वाढणार आहे. त्यामुळे महापौर तात्यांनी तातडीने ता. २० नोव्हेंबर रोजी गुंठेवारीच्या विषयावर तातडीने विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली. सभेचे निमंत्रण हातात पडल्यानंतर भाजपमधील काही चाणाक्ष नगरसेवकांना ही बाब समजली. त्याचे परिणाम सोमवारी झालेल्या सभेत दिसले. सभेत विषय वाचताच भाजपचे सभागृह नेते ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी या विषयाची माहिती अर्धवट असल्याचे कारण पुढे करीत ही सभाच होऊ शकत नाही, असे सांगितले. लगेच नगरसेवक शैलेश स्वामी यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे ही सभा पाच मिनिटाच गुंडाळली. 

महापौर तोंडघशी; गटबाजी उघड
या घडामोडीतील दोन्ही नगरसेवक भाजपचे महत्त्वाचे नगरसेवक आहेत. गुंठेवारीची माहिती अर्धवट दिली होती तर ते प्रशासनाला सभेत विचारून घेऊ शकले असते. प्रशासनाला धारेवरही धरू शकले असते; पण तसे झाले नाही. यात महापौरच तोंडघशी पडले. पक्षातील गटबाजी समोर आली. गेल्या अनेक सभांत सातत्याने असे चित्र दिसत आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी याची दखल घेण्याची गरज आहे. झालेल्या प्रकाराचे महापौरांना गाजर देत काँग्रेसने त्याचे भांडवल केले. या प्रकाराची मोठी चर्चाही झाली. या सर्व प्रकारात गुंठेवारीचा विषय मात्र मागेच राहिला. तो पुन्हा कधी येणार याकडे लातूरकरांचे लक्ष आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com