उद्यापासून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

लातूर - राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी हाती घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सोमवारपासून (ता. 23) कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होणार आहे. योजनेत कर्जमाफी दिलेल्या गावनिहाय मोजक्‍या शेतकरी लाभार्थींची यादी (ग्रीन लिस्ट) सरकारने योजनेच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या यादीनुसार बॅंकेकडून पडताळणी होऊन कर्जखात्यात कर्जमाफीचा जमाखर्च होण्यास सुरवात होणार आहे. 

लातूर - राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी हाती घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सोमवारपासून (ता. 23) कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होणार आहे. योजनेत कर्जमाफी दिलेल्या गावनिहाय मोजक्‍या शेतकरी लाभार्थींची यादी (ग्रीन लिस्ट) सरकारने योजनेच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या यादीनुसार बॅंकेकडून पडताळणी होऊन कर्जखात्यात कर्जमाफीचा जमाखर्च होण्यास सुरवात होणार आहे. 

मागील महिन्यात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेतल्यानंतर सरकारने दिवाळीपूर्वीपासून कर्जमाफीचे अर्ज मंजूर करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी मंगळवारी (ता. 17) कर्जमाफीचा लाभ मंजूर केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी सरकारने जाहीर केली असून यादीतील काही पात्र लाभार्थींचा बुधवारी (ता. 18) जिल्हा व राज्य पातळीवर सत्कारही करण्यात आला. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या संकेतस्थळावरच सरकारने लाभार्थींची यादी म्हणून ही यादी ऑनलाईन जाहीर केली आहे. त्यानुसार गावगणिक तीन ते शंभरावर शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. काही गावांत एकही अर्ज मंजूर झालेला नाही. जाहीर यादीनुसार सोमवारी बॅंकांकडून पडताळणी होऊन लागलीच शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात माफीची रक्कम जमा होणार आहे. कर्जमाफीची प्रक्रिया दोन प्रकारांत असणार आहे. यात दीड लाखापर्यंतच्या माफ झालेल्या कर्जाचा जमाखर्च होऊन बॅंकेकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मेसेज जाणार आहे. बॅंकांकडून अशा शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. दीड लाखाच्या पुढील कर्जासाठी उर्वरित रक्कम भरण्यासाठी बॅंकेकडून संपर्क केला जाणार आहे. दुसऱ्या प्रकारात चालू थकबाकीदारांच्या खात्यात पंचवीस हजार रुपयापर्यंत रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी सरकारकडून संबंधित बॅंकांना निधी देण्यात येणार आहे. सरकारकडून निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांचेच अर्ज मंजूर केले जात आहेत. त्यासाठी प्राप्तिकर विभाग व अन्य विभागांकडून शेतकऱ्यांच्या नावांचीही पडताळणी केली जात आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचे अर्ज मंजूर केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर होणार असल्याचे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

आक्षेप अन्‌ अपिलासाठी समिती 
कर्जमाफी मंजूर केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीवर आक्षेप घेण्यासाठी तसेच कर्जमाफीच्या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांना तालुका समितीकडे अपील करता येणार आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) हे सचिव आहेत. दोघांच्या कार्यालयात शेतकऱ्यांचे आक्षेप अर्ज स्वीकारून त्यानुसार अद्ययावत माहिती किंवा अर्जातील दुरुस्तीची प्रक्रिया होणार आहे. तालुका समितीने अर्ज नामंजूर केल्यास शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीकडेही धाव घेता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: latur news loan farmer's account