सारोळा तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

हरी तुगावकर 
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

हे दोन्ही मुले शाळेतून घरी न जाता पोहण्यासाठी सारोळा येथील तलावावर गेल्याचा अंदाज आहे.

लातूर : सारोळा (ता. लातूर) येथील शिवारात असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचे मृतदेह बुधवारी (ता.१३) सकाळी दिसून आले आहेत. ही दोन्ही मुले येथील यशवंतविद्यायलाचे विद्यार्थी असून ते मंगळवारी (ता. १२) दुपारी पोहण्यासाठी या तलावात गेली होती.

या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. येथील नांदेड रस्त्यावरील यशवंत विद्यालयात मंगळवारी पायाभूत चाचणी परीक्षा होती. या शाळेतील सुमीत दयानंद खंडागळे (वय १३, रा. बरकतनगर) व बालाजी सहदेव डोंगरे (वय १४ रा. विठ्ठलनगर) या दोघांनीही ही परीक्षा दिली. त्यानंतर हे दोन्ही मुले शाळेतून घरी न जाता पोहण्यासाठी सारोळा येथील तलावावर गेल्याचा अंदाज आहे. ते रात्री घरी परतलेच नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेवूनही ते मिळून आले नव्हते.

बुधवारी सकाळी या तलावात दोघांचेही मृतदेह तरंगताना दिसून आले आहेत. त्यानंतर याची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याला मिळताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली.  या मुलांचे दप्तर तलावाच्या शेजारीच आढळून आले आहे. पोलिसांनी हे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर नातेवाईकांकडून या मुलांची खात्री करून घेण्यात आली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :