लातूरच्या तरुणाची शॉर्ट फिल्म बर्लिन फेस्टिव्हलमध्ये

लातूरच्या तरुणाची शॉर्ट फिल्म बर्लिन फेस्टिव्हलमध्ये

लातूर - सांस्कृतिक क्षेत्रात लातूरचे नाव मानाने घेतले जावे, असे अनेक गुणी कलावंत येथे झाले आहेत. नाट्य, सिनेमा यासोबतच दूरदर्शन जगतात लातूरचा इतिहास निर्माण केला गेला. आता लातूरचे नाव थेट सातासमुद्रापलीकडे नेण्याचा मान येथील तरुण फिल्ममेकर अभिषेक कोळगे याने मिळवला आहे. बर्लिन फेस्टिव्हल २०१८ साठी अभिषेक कोळगे याने लातूरच्या मातीत बनविलेली ‘अवसान’ ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात येणार आहे. 

या फेस्टिव्हलचे सर्व निकष ‘अवसान’ शॉर्ट फिल्मने पूर्ण केले. जानेवारी २०१८ मध्ये होणार्या ‘बर्लिन फेस्टिव्हल’मध्ये लातूरकरांच्या या फिल्मची हजेरी पक्की झाली आहे. अभिषेक यांच्या या पहिल्याच उत्तम दिग्दर्शन प्रयोगाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आध्यात्मिक क्षेत्रातून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा वसा घेतलेल्या राजेंद्र आणि नंदा कोळगे यांचा अभिषेक हा मुलगा आहे. त्याने पुण्यातून स्थापत्य अभियंत्याची पदवी मिळविली. परंतु, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळताच अभिषेकने सिनेक्षेत्राची निवड केली.  या विषयातच त्याने लंडन येथून उच्च दर्जाच्या चित्रपटनिर्मितीचे धडे गिरवत तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. पदवीच्या अंतिम वर्षात जेव्हा चित्रपट बनविण्याची वेळ आली, तेव्हा तो सरळ मायदेशी परत आला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय त्याने निवडला. ग्रामीण भागातील हा जटिल प्रश्‍न मांडताना कुठल्याही माध्यमाचे लक्ष नसणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांची हिंमत ‘अवसान’ या शॉर्टफिल्ममधून चित्रित केली. २०१५मध्ये लंडन येथे ज्या विद्यापीठात अभिषेक चित्रपटाचे शिक्षण घेत होता, तिथे१५० विद्यार्थ्यांत अभिषेक हा एकमेव भारतीय विद्यार्थी होता. 

‘अवसान’ बर्लिन फेस्टिव्हलसोबतच २०१८मध्ये लंडनमध्ये उभारण्यात येत असलेल्या पहिल्या जागतिक डिजिटल थिएटरमध्ये ‘इंडियन मूव्हीज फ्रेंड्‌स’च्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. ‘अवसान’ ही राजनंदा प्रोडक्‍शनची पहिली शॉर्ट फिल्म आहे. निर्माता कॅरोली ड्रॅझलिक हे असून, दिग्दर्शन अभिषेक कोळगे याचे आहे. यामध्ये कलावंत म्हणून किशोर कदम, वीणा जामकर, शुभम परब, मृणाल जाधव, बाल कलाकार आरोही शशिकांत पाटील, प्रिषा जाधव यांच्या भूमिका आहेत. तर अनिकेत खंडागळे, अभिषेक शिवाल, अविनाश कांबळे, सागर वंजारी, विजय गावंडे, संकेत धूतकर यांनी या चित्रपटाची कामे केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com