पेटलेल्या कारमध्ये शिक्षिकेचा संशयास्पद मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

लातूर - पेटलेल्या कारमध्ये एका शिक्षिकेचा संशयास्पद जळून मृत्यू झाला आहे. लातूर-मुरूड रस्त्यावर बोरगाव काळे व करकट्टादरम्यान बुधवारी (ता. 23) पहाटे ही घटना घडली आहे. कारमध्ये जळालेल्या पत्नीला पतीने ट्रॅव्हल्समधून येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेत मुरूड (ता. लातूर) पोलिसांनी शिक्षिकेच्या पतीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

मुरूडचे सहायक पोलिस निरीक्षक टी. आर. भालेराव यांनी सांगितले, की लातूरच्या अवंतीनगर येथून शिवशंकर तुकाराम बनसोडे हा त्याची शिक्षिका पत्नी मीनाकुमारी (वय 34) यांना घेऊन मुरूड रस्त्याने कारने पहाटे तीन वाजता औरंगाबादला जात होता. दोघेही परीक्षेसाठी जात असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. बोरगाव काळेच्या पुढे गेल्यानंतर पहाटे पावणेचार वाजता कारने अचानक पेट घेतला. यात कार पूर्ण जळून खाक झाली. या घटनेत कारच्या मागील सीटवर बसलेल्या मीनाकुमारी भाजून गंभीर जखमी झाल्या. पेटलेली कार पाहून लातूरकडे जाणारी एक ट्रॅव्हल्स थांबली. या ट्रॅव्हल्समधून शिवशंकरने जखमी पत्नीला येथील सर्वोपचार केंद्रात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. शिवशंकरनेच मीनाकुमारीला जाळून मारल्याचा आरोप मीनाकुमारी यांच्या नातेवाइकांनी केला. यानंतर पोलिसांनी शिवशंकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने कारने पेट घेतल्यानंतर त्यातून उडी मारल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना त्याचा दावा पटला नाही. उडी मारली असती तर त्याला कुठे तरी लागले असते किंवा चालत्या कारमधून उडी मारल्यानंतर ती वेडीवाकडी धावून रस्त्याच्या खाली गेली असती. घटनेत कार रस्त्याच्या बाजूने उभी केल्याचे दिसत आहे. यामुळेच पोलिसांचा संशय बळावला आहे. घटनेत मीनाकुमारी या पन्नास टक्के भाजल्या होत्या. त्यांच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर डॉक्‍टरांनी व्हिसेरा राखून ठेवल्याचे श्री. भालेराव यांनी सांगितले. दरम्यान, शिवशंकरविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मृत मीनाकुमारी या शिवपूर (ता. शिरूर अनंतपाळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. 

Web Title: latur news Suspicious death of a teacher in a burnt car