साडेचार हजार जलस्रोतांचे ‘क्‍लोरिनेशन’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

लातूर - पावसाळा सुरु झाला की जलजन्य आजार तसेच साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव सुरु होतो. कधी कधी या रोगामुळे नागरिकांना आपला जीवही गमवावा लागतो. अशा घटनाही जिल्ह्यात घडल्या आहेत. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील चार हजार ७५७ जलस्रोतांचे ‘क्‍लोरिनेशन’ (निर्जंतुकीकरण) करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अशी मोहीम हाती घेणारी ही एकमेव जिल्हा परिषद आहे.

जलजन्य आजारांना निमंत्रण
जलस्रोतांचा परिसर स्वच्छ नसणे, स्रोतांची स्वच्छता नसणे त्यात पावसाळा सुरु झाला की पाण्यासोबत जमिनीवरची घाण या जलस्रोतात जाते. त्यातून हातपंप, विद्युतपंप, आड, विहिरीचे पाणी दूषित होते. ग्रामपंचायतीही याकडे फारशा लक्ष देत नाहीत. यातून गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, हागवण, कावीळ, विषमज्वर आदी जलजन्य आजारांना निमंत्रण दिले जाते. कधी कधी नागरिकांना आपला जीवही गमवावा लागतो. 

जिल्ह्यातील सर्वच जलस्रोतांचे क्‍लोरिनेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात एखाद्या ठिकाणी जलस्रोताचे पाणी दूषित होऊन जलजन्य आजाराच्या उद्रेकामुळे प्राणहानी झाल्यास संबंधित ग्रामसेवकावर कारवाईचा इशाराही डॉ. गुरसळ यांनी दिला आहे. 

कर्मचाऱ्यांना लावले कामाला
गेल्या काही महिन्यात प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यात अशाच जलस्रोतांचे पाणी दूषित आढळून आले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या आदेशानुसार ता. पाच ते २५ जुलै या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यात ग्रामसेवक, जलसुरक्षक, आरोग्य कर्मचाऱ्यांना आता कामाला लावण्यात आले आहे. क्‍लोरिनेशन करून पुन्हा पाण्याची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

पावसाळा सुरु झाला आहे. पहिल्या काही पावसात पावसाच्या पाण्यासोबत जमिनीवरील घाणीतील जंतू या जलस्रोतात येतात. त्यामुळे पाणी दूषित होते. त्याचा परिणाम जलजन्य आजार होतात. हे जंतू वेळेत नष्ट केले तर त्याचा निश्‍चित फायदा होतो. जलजन्य आजार व साथरोग टाळले जाऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांचे क्‍लोरिनेशन करण्यात येत आहे.
- चंद्रज्योती धनगे,  अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.