मार्च एण्डसाठी सव्वाशे कोटींची चौदाशे देयके दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

लातूर - मार्च एण्डच्या आधी निधी पदरात पाडून घेण्यासाठी जिल्हा परिषदेसह विविध सरकारी कार्यालयांनी गुरुवारी (ता. 30) हालचालींना वेग दिला. यातून गुरुवारी जिल्हा कोषागार कार्यालयात 124 कोटी रुपयांची एक हजार 369 देयके दाखल झाली आहेत. देयकांचा ओघ मार्चअखेरीला शुक्रवारी (ता. 31) वाढणार असला तरी देयकांचा निधी शुक्रवारी धनादेशाने वितरित केला जाणार आहे. दरम्यान, रात्रीचा दिवस करून देयकांचा निपटारा करण्यासाठी कोषागार कार्यालयाने नियोजन केले आहे. 

आर्थिक वर्षाचा शेवट म्हणून मार्चच्या शेवटच्या दिवशी निधी खर्चासाठी सर्वच सरकारी कार्यालये पुढाकार घेतात. निधी वितरणात ऑनलाईन प्रणाली येऊनही मार्च एण्ड आला की निधी खर्चासाठी नेहमीची धावपळ सरकारी कार्यालयांकडून सुरू होते. "नेमेची येतो पावसाळा' या उक्तीप्रमाणे "नेमेची येतो मार्च एण्ड' असा पायंडा आर्थिक वर्षात तरतूद झालेल्या निधी खर्चासाठी पडल्याचे दिसत आहे. यातूनच वर्षभर निवांत राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी मार्च एण्ड येताच दोन दिवसांपासून निधी खर्चासाठी धावपळ सुरू केली आहे. "बीडीएस' या सरकारच्या प्रणालीवर निधी येताच देयक (बिल) दाखल करून तो खात्यावर घेण्याचे प्रयत्न आहतरण व संवितरण अधिकाऱ्यांनी (डीडीओ) सुरू केले आहेत. देयक मंजूर करून त्याची रक्कम गुरुवारपर्यंत डीडीओंच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचे आदेश सरकारने दिले होते. शुक्रवारी मात्र, देयकाची रक्कम धनादेशाने (चेक) देण्याचे आदेश आहेत. तीन महिन्यांपर्यंत धनादेश वटवता येत असल्याने तसेच सरकारी तिजोरीतही सध्या खडखडाट असल्याने धनादेशाचा "मधला मार्ग' सरकारने काढल्याची चर्चा शासकीय वर्तुळात आहे. यात वर्षभर देयकांची ऑनलाईन रक्कम वर्ग करणाऱ्या कोषागारातील अधिकाऱ्यांना आता देयकाच्या निधीचे धनादेश तयार करावे लागणार आहेत. देयकांची आवक वाढल्यामुळे जिल्हा कोषागाराचे कामकाज बुधवारी (ता. 29) मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. गुरुवार व शुक्रवारीही याच पद्धतीने कामाचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी सचिन कवठे यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत देयक स्वीकारण्याचे आदेश आहेत. मात्र, या मुदतीत वाढ होण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली.

Web Title: latur zp Fourteen hundred bills filed