पालकमंत्र्यांचा तिहेरी बाण!

हरी तुगावकर
बुधवार, 22 मार्च 2017

लातूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा मुत्सद्दीपणा दिसून आला. अध्यक्षपदी मिलिंद लातुरे यांची निवड करीत संघ परिवाराला त्यांनी खूश केले. दुसरीकडे निवडणुकीच्या वेळी शेतकरीच अध्यक्ष करण्याचे लातूरकरांना दिलेले वचन त्यांनी पाळले. तर तिसरे म्हणजे, अध्यक्षपदासाठी आपलाच कार्यकर्ता व्हावा, याकरिता प्रयत्न करीत असलेल्या पक्षातील नेत्यांना ‘कात्रजचा घाट’ दाखविला. इतकेच नव्हे, तर उपाध्यक्षपदी रामचंद्र तिरुके यांची निवड करून त्यांनी निलंग्याचेच वर्चस्व दाखवून दिले.

लातूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा मुत्सद्दीपणा दिसून आला. अध्यक्षपदी मिलिंद लातुरे यांची निवड करीत संघ परिवाराला त्यांनी खूश केले. दुसरीकडे निवडणुकीच्या वेळी शेतकरीच अध्यक्ष करण्याचे लातूरकरांना दिलेले वचन त्यांनी पाळले. तर तिसरे म्हणजे, अध्यक्षपदासाठी आपलाच कार्यकर्ता व्हावा, याकरिता प्रयत्न करीत असलेल्या पक्षातील नेत्यांना ‘कात्रजचा घाट’ दाखविला. इतकेच नव्हे, तर उपाध्यक्षपदी रामचंद्र तिरुके यांची निवड करून त्यांनी निलंग्याचेच वर्चस्व दाखवून दिले. यासोबतच लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व देऊन येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत हा समाज भाजपच्या पाठीशी कसा उभा राहील, याचाही प्रयत्न केला. एका दगडात अनेक पक्षी मारण्याचे कसब श्री. निलंगेकर यांनी केले. 

जिल्हा परिषदेत ५८ पैकी ३६ जागा जिंकत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. एका अपक्षानेही त्यांना पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे १५ व राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच व शिवसेनेचा एक सदस्य आहे. 

अध्यक्षपद हे सर्वसाधारणसाठी खुले होते. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची कसोटी होती. यात माजी राज्यमंत्री आमदार विनायक पाटील यांनी प्रकाश देशमुख यांच्यासाठी मुंबईवारी केली होती. माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी मुलगा राहुल केंद्रे यांच्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. तर श्री. निलंगेकर हे अध्यक्षपदावर आपलाच कार्यकर्ता कसा राहील हे पाहत होते. त्यात त्यांनी निवडणुकीच्या वेळी शेतकरी हा अध्यक्ष राहील असे लातूरकरांना आश्वासन दिले होते. या सर्व गोष्टी संभाळत श्री. निलंगेकर यांनी यात बाजी मारली.  

निलंगा तालुक्‍यातील कासारबालकुंदा गटातील शेतकरी असलेले मिलिंद लातुरे यांची त्यांनी अध्यक्षपदी निवड केली. ‘लाल दिवा’ निलंग्याकडेच ठेवत पक्षातील नेत्यांना त्यांनी ‘कात्रजचा घाट’ दाखविला. श्री. लातुरे हे संघाशी संबंधित आहेत. त्यांची निवड करून श्री. निलंगेकर यांनी संघ परिवारालाही खूश केले. अनुभवी असलेले रामचंद्र तिरुके यांना उपाध्यक्ष करून जिल्हा परिषदेवर निलंग्याचेच वर्चस्व राहील हे पक्षातील नेत्यांना दाखवून दिले.

जातीय समीकरणावर लक्ष
या निवडीत श्री. निलंगेकर यांनी आणखी एक महत्त्वाची खेळी खेळली. आता त्यांचे लक्ष महापालिकेच्या निवडणुकीवर आहे. या निवडणुकीत बहुमत मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यातून त्यांनी श्री. लातुरे यांच्या रूपाने लिंगायत समाजाला, तर श्री. तिरुके यांची निवड करून यलम समाजाला प्रतिनिधित्व दिले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच लिंगायत समाजाचा अध्यक्ष व यलम समाजाचा उपाध्यक्ष झाला आहे. हे दोन्ही समाज महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या पाठीशी उभा करण्याचा श्री. निलंगेकर यांचा प्रयत्न यातून दिसून येत आहे.

Web Title: latur zp president milind lature