विमान उडल्यावरच शेतकऱ्यांना सोडा; पोलिसांना आदेश

विमान उडल्यावरच शेतकऱ्यांना सोडा; पोलिसांना आदेश

औरंगाबाद : गतवर्षीच्या बोंडअळी नुकसानीचा न मिळालेला मोबदला, खरिपाच्या पेरणीसाठी वेळेवर न मिळणारे पीककर्ज यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मागील काळात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तताही करता न आल्याने आता शेतकऱ्यांना कसे सामोरे जायचे, असा सरकारसमोर प्रश्‍न उपस्थित झाला आहे. दरम्यान, रविवारी (ता. 10) सकाळी अकरा वाजता खरीप हंगाम नियोजन बैठकीमध्ये कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जाब विचारण्यास ग्रामीण भागातून शेतकरी निघाले होते. याची माहिती मिळताच त्यांना गाव परिसरातच पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे सदाभाऊंना आता शेतकऱ्यांची भीती वाटत असल्याचे बोलले जात आहे.


दरवर्षी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगामपूर्व बैठक घेतली जाते. दोन महिन्यांपूर्वीच पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत वाल्मी येथे याबाबतची बैठकही झाली. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या बैठकीकडे बहुतांश आमदारासह भाजपाच्याही नेत्यांनी पाठ फिरवल्याने अक्षरश: ही बैठक उरकावी लागली. त्यानंतर शेतकऱ्यांमधून यावर टीकाटिप्पनीही झाली होती. विशेष म्हणजे पेरणीपूर्वीच पीककर्ज मिळायला हवे, यावर चर्चा करीत तशा प्रशासनास सूचनाही देण्यात आल्या होत्या; मात्र पुढे याबाबत काहीही आढावा घेण्यात आलेला नाही. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात केवळ साडेपाच टक्‍के शेतकऱ्यांनाच पीककर्ज मिळाले आहे. 
यामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला संताप कमी करण्यासाठी तसेच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यंदा प्रथमच कृषीराज्यमंत्री  खोत यांना प्रत्येक विभागात पेरण्या सुरू झाल्यानंतर खरीप हंगाम नियोजन बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 
त्यानूसार ते राज्यभर दौरे करीत आहेत. रविवारी त्यांच्या उपस्थितीत येथील विभागीय आयुक्‍त कार्यालयात मराठवाडा विभागाची बैठक झाली. तत्पूर्वी या बैठकीमध्ये घुसून कर्जमाफी, बोंडअळीची नुकसान भरपाई, पीककर्ज का दिले जात नाही, याचा जाब विचारण्यास औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातून काही शेतकरी निघाले होते. याची कुणकूण लागताच या बैठकीत मंत्र्यासमोर गोंधळ नको, म्हणत संबंधित शेतकऱ्यांना गाव परिसरातच रोखत सिल्लेगाव पोलिस ठाण्यात आणले. तसेच अन्य ठिकाणाहूनदेखील कुणी आल्यास त्याला आत जाऊ द्यायचे नाही, यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावरून कृषीमंत्री खोत यांनी शेतकऱ्यांच्या रोषाचा चांगलाच धसका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

विमान उडाल्यानंतरच करा शेतकऱ्यांची सुटका
 शेतकऱ्यांच्या रोषाचा खोत यांनी चांगलाच धसका घेतला आहे. औरंगाबाद शहरापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर शेतकऱ्यांना ताब्यात घेतलेले आहेत. तरीही सदाभाऊ बसलेल्या विमानाचे उड्डाण झाल्यानंतरच शेतकऱ्यांना सोडा, असे आदेशच संबंधित पोलिसांना दिले आहेत. यावरून खोत यांच्यामध्ये शेतकऱ्यांना सामोर जाण्याची क्षमता राहीलेली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. 

बियाणे कंपन्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना बोंडअळीसारख्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. कंपन्यांचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांपासून वरपर्यंत लाभार्थी असल्यानेच कारवाई होत नाही; मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर करोडो रुपये कमविणाऱ्या कंपन्यांनी जर नुकसान भरपाई दिली नाही; तर आंदोलन व्यापक करू. शिवाय, सरकारला आगामी काळात शेतकाऱ्यांचा रोष महागात पडेल. 

संतोष जाधव, आंदोलक शेतकरी, गंगापूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com