'पोस्टमन ऍप'ने टपालची होणार हायटेक डिलीव्हरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

राज्यातील पथदर्शी प्रकल्प औरंगाबाद विभागात सुरू - 157 पोस्टमनला सुविधा

राज्यातील पथदर्शी प्रकल्प औरंगाबाद विभागात सुरू - 157 पोस्टमनला सुविधा
औरंगाबाद - घरोघरी पत्र वाटणारे पोस्टमन मामाही आता ग्राहकांना हायटेक पद्धतीने पार्सलची पोच देणार आहेत. पोस्टाने स्वतः विकसित केलेल्या "पोस्टमन मोबाईल ऍप'च्या साथीने आता त्यांचा कारभारही केवळ एका मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. राज्यातील हा पथदर्शी प्रकल्प औरंगाबाद विभागात राबविण्यात सुरू करण्यात आल्याचे पोस्ट मास्टर जनरल प्रणवकुमार यांनी सांगितले.

यासंबंधी औरंगाबाद विभागाच्या मुख्यालयात गुरुवारी (ता. 18) पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रवर अधीक्षक ए. एच शेख, अधीक्षक एस. बी. लिंगायत, एस. एस परळीकर यांची उपस्थिती होती.

राज्यातील या पहिल्या प्रकल्पाच्या माध्यमातून औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यातील 157 पोस्टमन या ऍप्लीकेशनच्या माध्यमातून सेवा देणार आहेत. यासाठी या सगळ्या मनुष्यबळास तीन दिवस हे ऍप वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आले. आता ते थेट काम सुरू करणार आहेत. त्यामुळे स्पीडपोस्ट, मनीऑर्डर, पार्सल, बल्क डिलीव्हरी, रजिस्टर्ज पोस्ट हे पार्सल आता कुठल्या स्थितीत, कुठल्या ठिकाणी आहे, हे ग्राहकाला सहजरित्या समजणार आहे. पोस्टमनच्या कामावर पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयाची थेट नजर राहणार आहे. संबंधित ग्राहकाला डिजीटल स्वाक्षरी दिल्यानंतरच टपाल स्वीकारता येणार आहे.

या प्रकल्पात औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातील कन्नड, वैजापूर आणि जालना, भोकरदन या पोस्ट ऑफिस अंतर्गत ही सेवा सध्या कार्यान्वित करण्यात आली आहे. पोस्टाच्या सीईपीटी या म्हैसूर येथील पोस्ट प्रयोगशाळेत हे ऍप तयार करून त्याची कठोर चाचणी झाली आहे.

पोस्टमनचा वेळ वाचणार
सकाळी कार्यालयात आल्यावर दिवसभर वाटाव्या लागणाऱ्या टपालाची यादी करावी लागते. त्या यादीची प्रिंटेड कॉपी घेऊन पोस्टमन हे टपाल वाटायला निघतात. त्यानंतर टपाल वाटल्याची किंवा वापस आल्याची नोंद करावी लागायची आणि त्यात पोस्टमनचा बराच वेळ जायचा. आता केवळ मोबाईलची कॉर्ड कॉम्प्युटर लावली की ही यादी त्यांना प्राप्त होणार आहे. टपाल वाटपानंतरही त्यांना लिखाण काम करण्याचे काम नाही. कारण टपाल दिल्यानंतर लगेचच ही यादी अपडेट होणार आहे.

"आधार'मध्ये दुरुस्तीही होणार
केंद्र सरकारतर्फे नागरिकांना सेवा पुरविणाऱ्या अनेक योजनांची अंमलबजावणी पोस्टाच्या माध्यमातून करण्यात येते आहे. त्याचाच भाग म्हणून पोस्ट पासपोर्ट सेवा केंद्राची उभारणी औरंगाबादेत करण्यात आली. आता "आधार' कार्डात झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी पोस्टात सेवा देण्यात येणार असल्याची माहिती प्रणवकुमार यांनी दिली.