दारूबंदी नावाला, विक्री साऱ्या गावाला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्कचे दुर्लक्ष
राष्ट्रीय महामार्ग २२२ वर असलेल्या ढाब्यांवर अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. अनेक ढाब्याच्या परिसरात देशी विदेशी दारूच्या बाटल्याचा खच पडलेला दिसून येत आहे.

मानवत : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दोन तालुक्यांतील राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील बार आणि दारूचे दुकाने बंद झाले असले तरी महामार्गावर आणि ग्रामीण भागात नवीन-नवीन युक्त्या, शक्कल लढवून दारूची चोरटी वाहतूक करून विक्री केली जात आहे. पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभाग ठोस कारवाई करीत नसल्याने ‘दारूबंदी नावाला विक्री साऱ्या गावाला’चे चित्र परिसरातील ग्रामीण भागातही दिसून येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग २२२ वर असलेल्या ढाब्यांवर अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. अनेक ढाब्याच्या परिसरात देशी विदेशी दारूच्या बाटल्याचा खच पडलेला दिसून येत आहे. ढाबा, रेस्टॉरंटच्या नावाखाली चोरून लपून दारूची विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शहराबाहेरील ढाब्यावर अचानक गेल्यास प्रत्येक टेबलवर दारूच्या बाटल्या दिसून येत आहेत. हा प्रकार बिनदिक्कतपणे सुरू असताना संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरील पाचशे मीटरच्या आतील दारू दुकाने बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर दारूमाफिया या संधीचा चांगलाच फायदा उचलीत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातही दारूचे बॉक्स माफियामार्फत पुरविले जात आहेत. यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांचा सरार्स वापर होत असून थेट गावातच दारू पोचत असल्याने ग्रामीण भागात ही दारूमाफियाने पाय पसरविल्याची माहिती मिळत आहे. रस्त्यावरील लहान मोठ्या चहाच्या दुकानावर ही दारुच्या बाटल्या मिळत असून चढ्याभावाने तळीरामांना विक्री केल्या जात असून अनेकांचे संसार यामुळे उघड्यावर आले आले अाहेत.

कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा विक्री सुरू
राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रेत्यावर पोलिस कारवाई करतात, मात्र कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा दारूची अवैध विक्री केली जाते. या अवैध दारू विक्री विरोधात पोलिस, ग्रामस्थ, राज्य उत्पादन शुल्क यांनी एकत्र येत मोठी मोहीम उघडून दारूची अवैध विक्री कायमची बंद करणे गरजेचे आहे.

Web Title: liquor sale all over despite ban