सहा लाखांची बॅंग पळविणारे दोनजण जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

वैजापूर - अजंठा वाईन शॉपमधून पाच लाख 95 हजार रुपयांची रक्कम दुचाकीवरून घेऊन जाताना दोन नोकरांना बंदुकीचा धाक दाखवून रक्कम पळविणाऱ्या तीन भामट्यांसह अन्य तीन साथीदारांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील दोघे वैजापूर शहरातील असून, त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

वैजापूर - अजंठा वाईन शॉपमधून पाच लाख 95 हजार रुपयांची रक्कम दुचाकीवरून घेऊन जाताना दोन नोकरांना बंदुकीचा धाक दाखवून रक्कम पळविणाऱ्या तीन भामट्यांसह अन्य तीन साथीदारांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील दोघे वैजापूर शहरातील असून, त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

वैजापूर शहरातील मुख्य स्टेशन रस्त्यावर प्रकाश चव्हाण यांचे अजंठा वाईन शॉप नावाचे दुकान आहे. ता. 27 फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमरास दुकानातील नानासाहेब सोमाशे व बनकर हे दोघे नोकर दिवसभरात दुकानात जमा झालेल्या पाच लाख 96 हजार रुपयांची रक्कम एका बॅगमध्ये भरून प्रकाश चव्हाण यांना गोदावरी कॉलनी येथे घरी देण्यासाठी दुचाकीवर जात होते. कॉलनीत काही अंतर गेल्यावर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन भामट्यांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवून रक्कम पळविली. या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा घडल्यानंतर पोलिस अधीक्षक नविनचंद्र रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक उज्ज्वला बनकर, पोलिस निरीक्षक के. डी. चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी आरोपींचा वैजापूर, वीरगाव व नगर भागात शोध घेतला. या मोहिमेदरम्यान हा गुन्हा वैजापूर येथील फुलेवाडी रोड भागात राहणाऱ्या वैभव पोपट सरवर याने व त्याच्या साथीदारांनी केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यावज्रून पोलिसांनी फुलेवाडी रोड भागात जाऊन वैभवला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता या गुन्ह्यात संजय हरिभाऊ वाघ, रा. भायगाव (ता. वैजापूर), रोहित अशोक आहिरे, रा. समतानगर टाकळी रोड नाशिक, सागर मनोहर ढवळे रा. टाकळी रोड नाशिक व किरण पुंडलिक पवार, रा. अनुसयानगर नाशिक यांचा सहभाग असल्याचे त्याने सांगितले. यातील काही आरोपींना पोलिसांनी संशयावरून नाशिक पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जळगाव, नाशिक येथील मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. सर्व संशयित आरोपींना वैजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलिस नाईक शेख कासम, हवालदार जितेंद्र बोरसे, सुनील ढेरे, योगेश हरणे, गोपाल पाटील, गणेश सोनवणे, अब्बुबकर शेख, सुभाष ठोके व वैजापूर पोलिस स्टेशनचे विजय खोकड, राहुल थोरात यांनी जेरबंद केले.

Web Title: loot in aurangabad