नुकसानीच्या पंचनाम्याचे ग्रामपंचायतीकडून वाचन - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

लातूर - जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार 23 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. हे क्षेत्र वाढणार आहे. येत्या आठ दिवसांत पंचनामे करण्याचे काम पूर्ण होईल. तक्रारी येऊ नयेत म्हणून या पंचनाम्याच्या याद्यांचे संबंधित गावांच्या ग्रामंपचायतीकडून पंचनाम्याचे वाचन केले जाईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी (ता. 16) येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्ह्याला बुधवारी अवकाळी पावसाने झोडपले. यात लातूर व औसा तालुक्‍यांत तर गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार गारपिटीनंतर 24 तासांच्या आत आपण नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलो आहे. या गारपिटीमुळे गहू, द्राक्ष, हरभरा, डाळिंब, मका, भाजीपाला, उसाचे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाला पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे. ढाकणी येथे वीज पडून एक तरुण ठार झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत केली जाणार आहे. या तरुणाच्या नावे सातबारा असेल तर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून आणखी दोन लाख रुपये त्याच्या कुटुंबीयाला दिले जाणार आहेत. वीज पडून जनावरेही ठार झाली असून त्यांच्या संबंधित पशूपालकांनाही मदत दिली जाईल, असे ते म्हणाले. यावेळी सत्तार पटेल, अरुण कुलकर्णी, राजेंद्र मोरे, अप्पर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर उपस्थित होते.

22 लाख क्विटंल तूर खरेदी
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शासनाने आतापर्यंत 22 लाख क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. यात 570 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. 150 कोटी रुपये अद्याप द्यायचे बाकी आहेत. तेही लवकर दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांकडे तूर आहे तोपर्यंत ती खरेदी केली जाईल. जास्तीत जास्त बारदाना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. लातूर जिल्ह्यात तुरीने गोदाम भरले आहेत. अशा वेळी साखर कारखान्याचे गोदाम घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जास्त झालेली तूर कुर्डूवाडीच्या गोदामाला पाठवावी, असे आदेश देण्यात आल्याचे श्री. खोत म्हणाले.

Web Title: loss postmortem by grampanchyat