#MarathaKrantiMorcha क्रांतिदिनी "महाराष्ट्र बंद'चा इशारा 

#MarathaKrantiMorcha  क्रांतिदिनी "महाराष्ट्र बंद'चा इशारा 

औरंगाबाद - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी येत्या नऊ ऑगस्टला क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय लातूर येथे रविवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधूनच यावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी पंढरपूर परिसरात कोणतेही आंदोलन करू नये, तसेच राज्यभर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवावे, असा निर्णय घेतल्याची माहिती औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली. 

औरंगाबादेतून नऊ ऑगस्ट 2016 मध्ये मराठा क्रांती मूक मोर्चास सुरवात झाली होती. या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून महाराष्ट्र बंदसाठी हा दिवस निवडण्यात आला आल्याचे समन्वयकांनी सांगितले. यादरम्यान औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात रविवारी दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच होते. त्या ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. समन्वयक म्हणाले, ""ज्या ठिकाणी वारकरी थांबले असतील, त्या परिसरात सरकार विरोधातील मराठा क्रांती मोर्चाने कुठलेही आंदोलन करू नये. तसेच मराठा समाजाने त्या प्रकारचा प्रयत्न करू नये. वारीच्या आडून काही धर्मांध शक्ती मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने गोंधळ घालण्याची शक्‍यता आहे, त्याचे खापर मराठा समाजावर फोडण्याचेही त्यांचे कारस्थान आहे. मराठा आरक्षण आणि आरक्षणाशिवाय होत असलेली मेगा भरती रद्द करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील आंदोलन हे जिथे वारकरी थांबले नसतील, अशा ठिकाणी करावे. जेणेकरून वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही, असा निर्णय औरंगाबादच्या मराठा क्रांती मोर्चातर्फे घेण्यात आला आहे.'' 

सोलापूर, मुंबईत आंदोलन 
सोलापूर, मंगळवेढा, बार्शी, माढा, इंदापूर भागात एसटीवर दगडफेकीच्या घटना घडल्याने वाहतुक बंद करण्यात आली. मुंबई, ठाणे व नवी मुंबईत देखील विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. नवी मुंबई व ठाण्यात दोन दिवसांपासून ठिय्या सुरू आहे. कल्याण व परिसरात 25 जुलै रोजी मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. 

युवकांचे अर्धनग्न आंदोलन 
बीड - परळी येथून सुरू झालेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाला पाठिंबा म्हणून पाटोदा येथील तहसील कार्यालय परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच असून, आंदोलक आक्रमक आहेत. रविवारी युवकांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com