'कॉंग्रेसकडून राणेंवर अन्याय नाही'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

राणे यांनी केलेले आरोप निराधार असून त्यात कोणतेही तथ्य नाही. मी जास्त बोलू इच्छित नाही. नो कॉमेन्ट. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 
अशोक चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष 

नांदेड - कॉंग्रेसला इतिहास, परंपरा असून पक्षात अनेक दिग्गज नेते होते, आहेत आणि यापुढेही होतील. त्यामुळे कुण्या एकाच्या जाण्याने पक्ष संपत नाही. नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कॉंग्रेसकडून कोणताही अन्याय झाला नाही; उलट पक्षाने त्यांना भरभरून दिले असल्याचे मत कॉंग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. भाजपच्या एका बड्या नेत्याने कालच राणे यांचे संबंध दाऊदशी असल्याचे सांगितले आणि राणे यांनी आज राजीनामा दिला. त्यामुळे राणेंना भाजपकडून ब्लॅकमेलिंग होत होते की काय, याचाही तपास करायला हवा, अशी टिप्पणीही त्यांनी केली. 

वाघमारे म्हणाले, "कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर राणे यांना राज्यात मंत्रिपद देऊन महत्त्वाची खाती दिली. सत्ता जाईपर्यंत ते मंत्रिपदावर कायम होते. एवढेच नव्हे तर पक्षाने राणे यांच्या कुटुंबात तीन- तीन तिकिटे दिली. एक मुलगा खासदार तर एक आमदार आहे. स्वतः राणे कोकण, नंतर मुंबईत वांद्य्रातून विधानसभा निवडणूक लढले. पराभूत झाले तरीही कॉंग्रेसने त्यांना विधान परिषदेवर घेतले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांची शिफारस केली. तरीही कॉंग्रेसने अन्याय केला, असे त्यांचे म्हणणे सयुक्तिक नाही.'' 

""मुख्यमंत्रिपदाबाबत त्या त्या वेळची राजकीय परिस्थिती पाहून पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतल्यामुळे त्याला अन्याय म्हणता येणार नाही. वरिष्ठ नेत्यांनीही त्यांची वारंवार भेट घेऊन पक्ष सोडू नका, असे सांगितले होते. आता त्यांचा व्यक्तिगत निर्णय असून, कॉंग्रेसने कधीही सुडाचे किंवा द्वेषाचे राजकारण केले नाही. राणे यांची कधीही कॉंग्रेसला अडचण किंवा ओझे झाले नाही. ते स्वतःहून पक्ष सोडून गेले,'' असेही वाघमारे म्हणाले. 

Web Title: maharashtra news congress narayan rane Dr. Raju Waghmare