मुख्यमंत्र्यांना औकात दाखवून देऊ- शेतकरी सुकाणू समितीचा हल्लाबोल

कर्जमाफी शेतकरी सुकाणू समिती
कर्जमाफी शेतकरी सुकाणू समिती

परभणी : विषाणुंनी भरलेले डोक असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रप्रेमाची भाषा शेतकऱ्यांना समजवण्याची गरज नाही, जेवढे सैनीक पाक युद्धात शहीद झाले नाहीत त्याहुन अधिक शेतकरी सरकारच्या धोरणामुळे ठार झालेत. हा राष्ट्रद्रोह नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित करीत शेतकरी संघटनांच्या राज्यव्यापी सुकाणू समितीने परभणीत मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल चढवला आहे. २६ सप्टेंबरनंतर मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची औकात दाखवून देऊ, असा इशारा देत २०१९ नंतर देवेंद्र फडणवीस झेंड्याच्या जवळ जायचेही लायकीचे राहणार नाहीत, अशी टीकाही समितीने केली आहे.

परभणीत सुकाणू समितीची राज्यव्यापी बैठक मंगळवारी (ता.२९) सावली विश्राम गृहात पार पडल्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी श्री मंगल कार्यालयात उपस्थित शेतकऱ्यांना पुढील आंदोलनाची माहीती दिली. या वेळी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, रघुनाथदादा पाटील, आमदार बच्चु कडु, डॉ. अजित नवले, डॉ. अशोक ढवळे, कालिदास आपेट, कॉ. विलास बाबर आदी उपस्थित होते.

ता.१५ ऑगस्ट नंतर सरकार पोलिसांच्या मदतीने आंदोलन दडपण्यासाठी पदाधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवुन डांबुन ठेवत आहे, असा आरोप समितीने करत परभणीत विलास बाबर आणि राजेभाऊ राठोड या दोघांना लक्ष्य करीत त्यांना अमानुषपणे तुरुंगात डांबल्याचा निषेध केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समितीला राष्ट्रद्रोही ठरविल्याच्या भाषणाचा धिक्कार या वेळी केला. शेतकऱ्यांना राष्ट्रद्रोही ठरविणारे सरकार बालीश आहे, शेतकऱ्यांना राष्ट्रप्रेमाची भाषा सांगायची गरज नाही. अशा शब्दात डॉ. नवले यांनी सरकारवर आसुड उगारला. मुख्यमंत्र्याना सत्तेचा माज चढला आहे. त्यामुळे त्यांची जिभ घसरत आहे. त्यांच्या जिभेला हाड नाही. डोक नसलेले सरकार आहे, अशी टीकाही श्री.आढाव यांनी केली. जिवाणु आणि विषाणुमधील फरक मुख्यमंत्र्यांना समजत नाही, मुख्यमंत्री गृहखात्याचा दुरुपयोग करुन आंदोलक शेतकऱ्यांना त्रास देत आहे. असा आरोप श्री.पाटील यांनी केला.

फौजफाटा अणि लवाजमा काढुन निवडणुकीत उतरा मग पाहु कोणाची अनामत रक्कम जप्त होते, असे आवाहन आमदार बच्चु कडुंनी मुख्यमंत्र्यांना दिले. युध्दात जेवढे सैनीक शहीद झाले नसतील त्याहुन अधिक शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ठार झालेत, असाही आरोप यावेळी त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातील किटाणु ता.२६ सप्टेंबर नंतर आपोआप बाहेर येतील, अशी जळजळीत टीकाही करण्यात आली. २०१९ नंतर तुम्ही झेंड्यालाही येण्याची औकात राहणार नाही, तुम्हाला तुमचा अंहकारच नष्ट करेल असे कडु म्हणाले. रावसाहेब दानवे असो की आमदार परिचचारक हे जेव्हा देशविरीधी बोलतात तेव्हा मुख्यमंत्री चुकार शब्दही काढत नाहीत. शेतकरी बोलले की ते देशद्रोही कसे असा संताप व्यक्त करीत सरकारची मस्ती जिरवण्याचे काम शेतकरीच करेल असा इशाराही त्यांनी दिला.

जळगावला शेतकरी परिषद
सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी अंतिम इशारा देण्यासाठी जळगाव येथे ता.२६ सप्टेंबर रोजी शेतकरी परिषद होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या परिषदेत सरकार विरोधी आंदोलनाची दिशा जाहीर होणार असून त्यात राज्यातील सर्व शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याचे सांगीतले. with photo.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com