औरंगाबादच ठरले क्रांती मोर्चाचा केंद्रबिंदू 

Maratha Kranti Morcha
Maratha Kranti Morcha

औरंगाबाद : मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू केलेल्या मोर्चाला गुरुवारी (ता. नऊ) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. ऐतिहासिक क्रांती मोर्चाला जन्म देणारी 9 ऑगस्ट 2016 रोजीची सकाळ आजही डोळ्यांसमोर तरळते. शिस्त आणि संयमाचा आदर्श ठरलेल्या न भूतो न भविष्यती निघालेल्या मोर्चासाठीची आचारसंहिता राज्यासह देशात, विदेशातही पाळली गेली. त्यानंतर चांगल्या गोष्टींचा पायंडादेखील येथूनच पडला. येथून केलेल्या आवाहनाला राज्यभरात प्रतिसाद दिला गेला. अशा अनेक गोष्टींमुळे क्रांती मोर्चाचे केंद्र औरंगाबाद राहिलेले आहे. 

मराठा समाजाच्या प्रश्‍नांकडे राज्यकर्त्यांचे होणारे दुर्लक्ष आणि कोपर्डी येथे घडलेल्या घटनेच्या निमित्ताने संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी मूक मोर्चाचे माध्यम निवडले गेले. विशेष म्हणजे मनात प्रचंड संताप, चीड असतानाही मूक मोर्चामध्ये शिस्तीचे पालन केल्याने सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला होता. या मोर्चाच्या धर्तीवर प्रारंभी जिल्हावार मोर्चे निघाले. त्यानंतर तालुका पातळीवरही मोर्चे काढण्यात आले. 
क्रांती मोर्चाचे हे लोण राज्यभर पसरले. परिणामी मोर्चाबाबत पुढील वाटचालीची सूत्रे येथूनच हलली हे विशेष! मुंबईत 9 ऑगस्ट 2017 रोजी काढलेल्या मराठा क्रांती महामोर्चाचे नियोजनही येथूनच झाले. राज्यव्यापी चर्चा व्हावी, त्यातून समाजहिताचे निर्णय, पुढील दिशा ठरविण्यासाठी येथे राज्याचे समन्वय कार्यालय सुरू करण्यात आले होते. 

कोपर्डी येथील घटनेनंतर नगरला लागूनच असलेल्या औरंगाबादेतही निषेध व्यक्‍त करण्याचे ठरले. मराठा संघटनांची पहिली छोटेखानी बैठक तीन ऑगस्ट 2016 रोजी पार पडली. दोनच दिवसांत पुन्हा दुसरी बैठक झाली. समाजातील आमदार, खासदारांची उपस्थिती होती. दोन दिवसांच्या अंतराने पत्रकार परिषद झाली. नऊ ऑगस्टला औरंगाबादच्या क्रांती चौकातून "मराठा क्रांती मूक मोर्चा' निघाला. या मोर्चासाठी तयार केलेली आचारसंहिता हेवा वाटावा अशीच होती. शिस्तबद्ध मोर्चासह निर्माण केलेले वेगवेगळे पायंडे आजही नजरेत दिसतात, असे आजही अनेकजण सांगतात. 

नेतृत्वाविना निघणाऱ्या लाखोंच्या मोर्चाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी बरोबर दोन महिन्यांनी म्हणजे नऊ ऑक्‍टोबरला पुन्हा राज्यव्यापी बैठकही येथेच झाली. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश येथील मोर्चाचे प्रतिनिधी सहभागी झाले. 14 डिसेंबरला नागपूरला अधिवेशनानिमित्ताने मोर्चा काढायचे ठरले. याचवेळी मराठा आरक्षणासाठी तज्ज्ञांची राज्य समिती नेमण्यात आली. 

नागपूर मोर्चाबाबत नेमकेपणाने दिशा ठरवण्यासाठी पुन्हा दोन महिन्यांनी म्हणजे 10 डिसेंबरला औरंगाबादेतच बैठक घेण्यात आली. याचवेळी औरंगाबादेत "मराठा क्रांती मूक मोर्चा'चे राज्यव्यापी कार्यालय असावे, यावर शिक्‍कामोर्तब झाले. त्याप्रमाणे सर्वांना सोयीचे आणि मध्यवर्ती ठिकाणी पाच महिने पूर्ण होण्याअगोदरच कार्यालयाचे उद्‌घाटन झाले. आजवरच्या इतिहासात मोर्चांची आगळीवेगळी रचना यशस्वीपणे राबविणाऱ्या औरंगाबादेतील मोर्चेकऱ्यांनी एका अर्थाने सर्व समाजालाच दिशा दिली, अशी प्रतिक्रिया आजही उमटत आहे. 

युवती, महिलांचा लक्षवेधी सहभाग 
पहिल्या मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी झालेल्या बांधवांनी काळ्या रंगाचे शर्ट तर युवती, महिलांनीदेखील काळ्या रंगाचेच कपडे परिधान केले होते. युवती आणि महिलांचा मोठा सहभाग लक्ष वेधून घेत होता. शिस्त काय असते, हे मोर्चाच्या निमित्ताने शहरवासीयांनी अनुभवले होते. मोर्चामार्गादरम्यान पिण्याच्या पाण्याचे पाऊच असो की रिकाम्या पाणी बॉटलसह अन्य कचरा उचलण्याचे कामही समन्वयकांनी केले. यानंतर राज्यभर याचे अनुकरण झाले. 

युवतींच्याच हस्ते दिले निवेदन 
मोर्चा म्हटला की, एकमेकांना केली जाणारी ढकलाढकली, घोषणांमुळे बसणाऱ्या कानठळ्या, गोंधळ असेच चित्र आपल्याला माहीत होते. मात्र, शिस्तीत मोर्चा असू शकतो, हे मराठा क्रांती मूक मोर्चाने दाखवून दिले. विशेष म्हणजे, ठरल्याप्रमाणे मागण्यांचे निवेदन केवळ युवतींनीच दिले. मागण्यांबाबत त्यांनी केलेले भाष्यही कौतुकास्पद ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com