धरणावरील सुरक्षा यंत्रणा कुचकामी

धरणावरील सुरक्षा यंत्रणा कुचकामी

माजलगाव - जायकवाडीचा दुसरा टप्पा म्हणून माजलगाव धरणाची ओळख आहे. परतीच्या पावसाने गतवर्षी हे धरण भरले होते. सध्या माजलगाव धरणामध्ये ६८ टक्के पाणीसाठा आहे. धरणावर असलेली सिसीटीव्ही यंत्रणा कोलमडली असून सोळापैकी केवळ सहाच कॅमेरे सुरू आहेत. 

माजलगाव धरणाच्या पाण्यावर बीड, परभणी, नांदेड या तीन जिल्ह्यांतील जमिनी सिंचनाखाली येतात, तर माजलगाव शहरासह अकरा खेडी, तसेच बीड शहरालाही माजलगाव धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परळी येथील औष्णिक विद्युत  केंद्रालाही येथूनच पाणीपुरवठा केला जातो. माजलगाव धरणाची मुख्य भिंत ही वर्जित क्षेत्र आहे. कोणत्याही व्यक्तीला धरण परिसरात फिरण्यासाठी शासनाने निर्बंध घातलेले आहेत. धरणाच्या निगराणीसाठी सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. परंतु सोळापैकी केवळ सहाच कॅमेरे सुरू असून दहा कॅमेरे बंद असल्याने सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली आहे. धणातील पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या झाल्याच्या घटनाही घडल्या असताना धरण प्रशासन मात्र कसल्याही प्रकारची उपाययोजना करीत नसल्याने धरणाच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील वर्षीदेखील माजलगाव धरण सप्टेंबर महिन्यात शंभर टक्के भरले होते व धरणातील पाणी सिंधफणा नदीपात्रात सोडण्यात आले होते. धरण भरल्यानंतर नदीपात्रात सोडलेले पाणी पाहण्यासाठी धरण परिसरात नागरिक मोठी गर्दी करतात. सद्यःस्थितीत माजलगाव धरणामध्ये ६८ टक्के पाणीसाठा असून जायकवाडी धरणातून कालव्याद्वारे पाण्याची आवक सुरूच आहे. धरण परिसरात बंद असलेली सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, तसेच परिसरात असलेले पथदिवे तत्काळ सुरू करण्याची गरज आहे.

धरण परिसरात सुरक्षेसाठी असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे महत्त्वाच्या ठिकाणचे कॅमेरे सुरू आहेत. दहा ठिकाणच्या कॅमेऱ्यांमध्ये बिघाड झालेला असून लवकरच ते सुरू करण्यात येतील. नागरिकांनीही धरण परिसरात वावर करू नये. धरणाच्या निगराणीसाठी चार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.
-राजेंद्र दहातोंडे, धरण अभियंता, माजलगाव धरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com