हवामान विभागाच्या विरोधात पोलिसांत फसवणुकीची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

पावसाच्या अंदाजावर शेतकऱ्याचा आक्षेप
माजलगाव - कुलाबा, पुणे वेधशाळेने या वर्षी चांगला पाऊस पडेल, असा खोटा अंदाज व्यक्त करून आपले आणि राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले असल्याचे नमूद करत गंगाभिषण थावरे या शेतकऱ्याने हवामान विभागाविरुद्ध दिंद्रुड (ता. माजलगाव, जि. बीड) पोलिसांत फसवणुकीची तक्रार दिली आहे.

पावसाच्या अंदाजावर शेतकऱ्याचा आक्षेप
माजलगाव - कुलाबा, पुणे वेधशाळेने या वर्षी चांगला पाऊस पडेल, असा खोटा अंदाज व्यक्त करून आपले आणि राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले असल्याचे नमूद करत गंगाभिषण थावरे या शेतकऱ्याने हवामान विभागाविरुद्ध दिंद्रुड (ता. माजलगाव, जि. बीड) पोलिसांत फसवणुकीची तक्रार दिली आहे.

संबंधित विभागाविरुद्ध दोन दिवसांत गुन्हा दाखल करावा, अन्यथा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी या तक्रारीत दिला आहे.
आनंदगाव (ता. माजलगाव) येथील कोरडवाहू शेतकरी, स्थानिक शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभिषण थावरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा आशय असा - यंदा चांगला पाऊस होईल, सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागातर्फे एप्रिल, मे मध्ये व्यक्त केला जात होता. या अंदाजावर विश्‍वास ठेवून राज्यातील शेतकऱ्यांनी महागडी बियाणी, खते खरेदी केली. जूनच्या प्रारंभी झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने पेरण्याही केल्या. त्यानंतर बऱ्याच भागांत पावसाने ओढ दिली. "48 तासांत पाऊस, 72 तासांत पाऊस येणार' असे अंदाज सातत्याने व्यक्त करून हवामान विभाग शेतकऱ्यांना फसवत राहिला. यामागे बियाणे कंपन्या, खत- औषध कंपन्या आणि हवामान विभागाचे आर्थिक हितसंबंध असण्याची शक्‍यता आहे.

याप्रकरणी हवामान विभागाविरुद्ध दोन दिवसांत गुन्हा दाखल करावा. तसे न झाल्यास दिंद्रुड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा थावरे यांनी दिला आहे. याबाबत तांत्रिक बाबी तपासून पुढील कारवाई केली जाईल, असे सहायक पोलिस निरीक्षक रवी सानप यांनी सांगितले. हवामान विभागाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.