उजनीवर सौरपॅनलद्वारे वीजनिर्मितीचा प्रस्ताव - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मंगळवेढा - उजनी धरणातील पाणीसाठ्यावर सौरपॅनल टाकून वीज तयार करण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी दिली. मंगळवेढा येथे ज्वारीचे केंद्र होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.

मंगळवेढा - उजनी धरणातील पाणीसाठ्यावर सौरपॅनल टाकून वीज तयार करण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी दिली. मंगळवेढा येथे ज्वारीचे केंद्र होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.

कृषिक्रांती फार्मर्स क्‍लब, वारी परिवार व "आत्मा' आणि कृषी व पणन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्वारी-मका परिषदेचे उद्‌घाटन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते आज झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल होते.

देशमुख म्हणाले, की विकास सोसायटीत शेतकऱ्यांना कर्ज देताना सुडाचे राजकारण केल्यामुळे मी राज्य बॅंकेत मध्यस्थी केली. कर्जमाफीबद्दल जशा अडचणी येतील, तशा सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

पाशा पटेल म्हणाले, की पंजाबमधील गहू व रोट्या मार्केटिंग केल्यामुळे महाराष्ट्रात आल्या, पण मंगळवेढ्यातील ज्वारीचे मार्केटिंग आता इतर ठिकाणी करणे गरजेचे आहे. मी कृषिमूल्य आयोगाचा अध्यक्ष झाल्यापासून या आयोगाच्या बैठका सुरू झाल्या. त्यामुळे ज्वारीला हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

...तर शेतकऱ्यांवर कारवाई
शेतकरी अडचणीत आहेत म्हणून सरकार कर्जमाफी देत असून, कर्जमाफीचे अर्ज शेतकऱ्यांनी स्वतः भरावेत. शेतकऱ्यांनी न घेतलेल्या कर्जाचे अर्ज भरल्यास त्याच्यासह संबंधित अध्यक्ष व सचिवावर कारवाई करण्याचा इशारा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला. कार्यक्रमात सहकारमंत्र्यांना शेतकऱ्यांनी अनेक चिठ्ठ्या पाठवल्या, त्यात कर्जमाफी अर्ज भरताना येणाऱ्या तक्रारी होत्या.