'मनरेगा' बंद करण्याचा भाजपचा डाव - करात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

जालना - 'मनरेगा' ही ग्रामीण भागाची "लाईफ लाईन' असून ती काटण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. त्यामुळेच या योजनेअंतर्गत जानेवारीपासून आजपर्यंत एकही काम सुरू झालेले नाही, असा आरोप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी गुरुवारी (ता.16) येथे पत्रकार परिषदेत केला.

"मनरेगा'अंतर्गत जालना जिल्ह्यात अद्याप एकही काम सुरू नाही, असे निदर्शनास आणून देत त्या म्हणाल्या, अनेक राज्यांच्या जिल्ह्यांत अशी स्थिती आहे. केंद्रातील भाजप सरकार संसदेमध्ये वेगळी आणि प्रत्यक्षात वेगळी भूमिका घेत आहे. एकीकडे हे सरकार अर्थसंकल्पात "मनरेगा'साठी हजारो कोटींची तरतूद करीत असल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे मजुरांच्या हाताला काम हवे असताना त्यांना ते मिळत नाही. "मनरेगा' ही ग्रामीण भागाची "लाईफ लाईन' असली तरी भाजप सरकारला ती नको आहे. त्यामुळेच या सरकारने मजुरांवर उपासमारीची वेळ आणली आहे. दरम्यान, यंदा चांगले उत्पादन होऊनही योग्य भाव मिळत नसल्याने मराठवाड्यातील शेतकरी अडचणीतच असल्याचे त्या म्हणाल्या.
पक्षाचे राज्य सचिव अण्णा सावंत, जिल्हा सचिव मधुकर मोकळे, महिला आघाडीच्या सचिव मरियम ढवळे आदी उपस्थित होते.

...तर चौकशी करा
मतदान यंत्रांमध्ये फेरफार होऊ शकतात, हे आम्हाला तज्ज्ञांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेशात मतदान यंत्रांत घोटाळा झाल्याचा आरोप होत असेल तर त्याची निवडणूक आयोगाने निःपक्ष चौकशी करणे आवश्‍यक असल्याचे मत वृंदा करात यांनी व्यक्त केले.