अनेक डॉक्‍टर "नीट'पासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

'काही दिवसांपासून पंतप्रधान डिजिटल इंडियाची घोषणा करीत आहेत; तर दुसरीकडे इंटरनेटवरून काढलेली प्रत चालणार नसल्याचे सांगून महत्त्वाच्या परीक्षेपासून मुकावे लागत आहे. त्यामुळे डिजिटल इंडिया हे शब्दच आम्हाला टोचत आहेत. रात्रंदिवस अभ्यास करूनही शासनाच्या चुकीच्या कारभारामुळे वंचित राहावे लागतेय, याची चीड येत आहे.''

- नितीन नाईकवाडे, परीक्षार्थी.

औरंगाबाद - ई-आधार नाकारत, "आम्हाला मूळ प्रतच हवी,' असे म्हणत डॉक्‍टरांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आवश्‍यक असलेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेला बसूच न दिल्याचा धक्‍कादायक प्रकार शहरात घडत आहे. विशेष म्हणजे कुठलीही सूचना न देता अचानकपणे ई-आधार चालणारच नसल्याचे सांगण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अश्रू आवरता आले नाहीत. यामुळे दोन वर्षांपासून तयारी करूनही परीक्षा देता न आल्याने संतापलेल्या डॉक्‍टरांनी हा प्रकार पंतप्रधान कार्यालयास कळवला आहे.

राष्ट्रीय परीक्षा बोर्डाकडून मराठवाड्यात प्रथमच होत असलेल्या या परीक्षेत चांगल्या गुणांनिशी उत्तीर्ण होणाऱ्यांना एम.डी. आणि एम.डी.एस. या अभ्यासक्रमास प्रवेश मिळणार आहे. बीड बायपास रस्त्यावरील रेणुकामाता मंदिर कमानीजवळील एसबीएच बॅंकेच्या वरील मजल्यावर सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत ही 3 तास 45 मिनिटांची ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. त्यासाठी मराठवाड्यातील डॉक्‍टरांनी ऑक्‍टोबर 2016 मध्येच 3 हजार 800 रुपये भरून मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. त्यानंतर परीक्षा अगदी काही तासांवर आलेली असतानाही प्रवेशपत्र संबंधित साईटवर उपलब्ध झालेले नव्हते. काहींना तर एक दिवस आधी मिळाले. त्यामुळे तातडीने त्याची प्रत काढून परीक्षा केंद्र गाठले. मात्र, ई-आधारवरून परीक्षेस प्रवेश नाकारण्यात आला. आधार कार्डाची मूळ प्रतच ग्राह्य धरली जाईल, असे आम्हाला आदेश असल्याचे उपस्थित केंद्र प्रमुखांनी सांगत अनेक डॉक्‍टरांना परीक्षेपासून वंचित ठेवले. सोमवारी (ता. पाच) सकाळी नऊ वाजल्यापासूनच केंद्राच्या परिसरात डॉक्‍टरांनी प्रचंड संताप व्यक्‍त केला.

या प्रकरणी काही विद्यार्थ्यांनी कोर्टात जाण्याची तयारी चालवली आहे.
जालना येथून आलेल्या एका महिला डॉक्‍टरनी केंद्र प्रमुखांना चांगलेच धारेवर धरले. "मला अद्यापही आधारची मूळ प्रत मिळालेलीच नाही, मग मी ती कुठून आणू, काय हवे, काय नको, हे आधीच सांगायला काय झाले होते,' असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले. आपण काही दिवसांपूर्वीच अशीच एक परीक्षा दिली. तेव्हाही अशी अडचण आलेली नव्हती, असे बजावले. त्यानंतर त्यांनी जालना येथून तातडीने आईला अन्य फोटो आयडी घेऊन बोलावून घेतले. मात्र, आता वेळ झाला असल्याचे सांगत परीक्षेस बसू दिले नाही. विशेष म्हणजे तिच्या मोबाईलवर दुपारी 12 वाजून 32 मिनिटांनी एका एसएमएसद्वारे प्रवेशासाठी ई-आधार चालणार नसल्याचे कळविले. परीक्षा सकाळी 10 वाजता असताना त्याबाबतच्या सूचना दुपारी मिळल्या. यावरूनच यंत्रणेचा सावळा गोंधळ लक्षात येतो. तसेच परीक्षा केंद्राच्या बाहेरदेखील तसा उल्लेख करण्याची तसदीही संबंधितांनी घेतली नाही.