मराठा क्रांती मोर्चा चक्‍काजामची जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

सोशल मीडियावर कोपर्डी प्रकरण, आरक्षणाचा विषय ऐरणीवर

औरंगाबाद - विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या चक्‍काजाम आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असून, ठिकठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत. तसेच सोशल मीडियावरही सध्या कोपर्डी प्रकरणासह चक्‍काजामबद्दलचे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे चित्र आहे.

सोशल मीडियावर कोपर्डी प्रकरण, आरक्षणाचा विषय ऐरणीवर

औरंगाबाद - विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या चक्‍काजाम आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असून, ठिकठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत. तसेच सोशल मीडियावरही सध्या कोपर्डी प्रकरणासह चक्‍काजामबद्दलचे मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे चित्र आहे.

मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारी (ता. 31) राज्यभर चक्‍काजाम आंदोलन होणार आहे. सकाळी अकरा वाजेपासून या "चक्‍काजाम'ला सुरवात होईल. तसेच प्रत्येक चक्‍काजामच्या ठिकाणी एक ऍम्ब्युलन्स उभी असावी, यादृष्टीने नियोजन केले जात आहे. याबाबत रविवारी (ता.29) राज्यव्यापी कार्यालयात झालेल्या बैठकीत या आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. चक्‍काजामचा निर्णय घेतल्यानंतर सर्वत्र तयारीला वेग आला. येथील राज्यव्यापी कार्यालयात याबाबत आचारसंहिता करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय रस्ते रोखण्यात येणार आहेत. शहरात हर्सूल टी पॉइंट, सिडको बसस्टॅंड, आकाशवाणी चौक, महानुभाव आश्रम चौक, देवळाई चौक, केंब्रिज शाळा चौक, ओऍसिस चौक, शरणापूर टी पॉइंट या ठिकाणी चक्‍काजाम होईल, असे ठरविण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान ऍम्ब्युलन्स, शाळांच्या वाहनांना वाट करून दिली जाणार आहे. थांबलेल्या वाहनांमध्ये लहान मुले असल्यास त्यांना पाणी, बिस्किटे देण्याची सोयही करण्यात आलेली असून, याबाबतही चर्चा करण्यात आली. रविवारी वाळूज महानगरातील पंढरपूर, शहरातील चिकलठाणा, सिडको, मयूरनगर, हडको, हनुमाननगर, शिवाजीनगर, विजयनगर, सातारा परिसरातील अयप्पा मंदिर येथे बैठका घेण्यात आल्या. आंदोलन शांततेत असेल, अशा सूचना बैठकीतून देण्यात आल्या. आंदोलनास कुणी हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न केल्यास, माहिती तातडीने पोलिसांना देण्यात यावी. व्हॉट्‌सऍप, फेसबुकसह अन्य माध्यमांतूनही अशाच पद्धतीने सूचना, आवाहन केले जात आहे.

पोलिस आयुक्‍तांशी आज पुन्हा चर्चा
चक्‍काजामचे संभाव्य स्वरूप लक्षात घेऊन पोलिस आयुक्‍त मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांशी चर्चा करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्‍त कार्यालयातही याच अनुषंगाने चर्चा झाली. त्यानंतर सोमवारी (ता.30) पुन्हा सकाळी अकरा वाजता आयुक्‍तालयात पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार हे चक्‍काजामबद्दल समन्वयकांशी चर्चा करणार आहेत.

शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन
चक्‍काजामची वेळ सकाळी अकरा वाजेपासून असल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ नयेत, याची काळजी घेतली जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही आंदोलनात सहभाग असावा, यासाठी संस्थाचालकांना आवाहन करण्यात आले आहे.