राज्यव्यापी मराठा क्रांती मूक मोर्चाचा ‘एमजीएम’मध्ये एल्गार!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - राज्यभरात सुरू असलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या व्यापक भूमिकेची मांडणी औरंगाबादमध्ये रविवारी (ता. नऊ) झालेल्या बैठकीत करण्यात आली. औरंगाबादच्या ‘एमजीएम’मध्ये झालेल्या या बैठकीत आतापर्यंतच्या मोर्चांचा आढावा घेत आंदोलनाची पुढील दिशाही ठरविण्यात आली आणि मुंबईऐवजी आधी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरला काढण्यात येणाऱ्या मोर्चाची निश्‍चिती झाली. 

औरंगाबाद - राज्यभरात सुरू असलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या व्यापक भूमिकेची मांडणी औरंगाबादमध्ये रविवारी (ता. नऊ) झालेल्या बैठकीत करण्यात आली. औरंगाबादच्या ‘एमजीएम’मध्ये झालेल्या या बैठकीत आतापर्यंतच्या मोर्चांचा आढावा घेत आंदोलनाची पुढील दिशाही ठरविण्यात आली आणि मुंबईऐवजी आधी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरला काढण्यात येणाऱ्या मोर्चाची निश्‍चिती झाली. 

औरंगाबादमध्ये निघालेल्या पहिल्या मोर्चानंतर टप्प्याटप्प्याने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत अतिविराट मराठा क्रांती मोर्चे निघाले. त्यानंतर सध्या ते राज्यभरात सुरू आहेत. सुयोग्य, नेटके नियोजन, शिस्त, संयम, महिला - तरुणी - विद्यार्थिनींना प्राधान्य, पाणी, नाश्‍ता ते मोर्चा संपल्यानंतर बाहेर पडेपर्यंत सर्वांची काळजी, मोर्चानंतर स्वच्छता आदी वैशिष्ट्यांनी सजलेला मोर्चांचा ‘औरंगाबाद पॅटर्न’ सर्वच ठिकाणी पाळला जात आहे. मुंबईतील क्रांती मोर्चाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा आणि उत्सुकता होती. त्याच्या नियोजनासाठी राज्यव्यापी बैठकीचा मानही औरंगाबादला मिळाला. येथील ‘एमजीएम’मधील रुक्‍मिणी सभागृहात आज ही बैठक झाली. बैठकीसाठी आवश्‍यक पुरेसे सभागृह, निवास, भोजनव्यवस्था आदींसाठी ही जागा कार्यकर्त्यांनी निश्‍चित केली होती. या बैठकीचे संयोजन बिगर राजकीय मंडळींकडून करण्यात आले. राज्यव्यापी बैठकीचा मान औरंगाबादला मिळाल्याने मराठा समाजातील येथील कार्यकर्ते, महिलांनी जिवाचे रान करीत बैठकीची तयारी केली. राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींची सभागृहात नेटकी व्यवस्था ठेवण्यात आली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही बैठक पार पडली. ठरल्याप्रमाणे राज्यभरातील प्रतिनिधींची भूमिका ऐकून घेण्यात आली. त्यानंतर मुंबईतील मोर्चाला तूर्त स्थगिती देऊन हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर मोर्चाची तारीख निश्‍चित झाली. बैठकीच्या यशस्वितेसाठी मराठा समाजातील स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांनी पोटतिडकीने, तळमळीने, तन-मन-धनाने कार्य केले. यापुढील काळात कुठल्याही प्रकारचा वाद होऊ न देता राज्यव्यापी आंदोलन अधिक प्रभावी करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला. आंदोलनासंदर्भात होणाऱ्या उलटसुलट चर्चेला छेद देत कार्यकर्त्यांनी हे आंदोलन यशवी करण्याचा निर्धार केला. बिगर राजकीय पक्षाचे आंदोलन असल्याने त्यात राजकारण शिरूच शकणार नाही, हे आजच्या बैठकीतून स्पष्ट झाले.

टॅग्स